Advertisement

संदिप खोमणेकडून वाळू माफियांना प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष पाठबळ !

प्रजापत्र | Saturday, 20/06/2026
बातमी शेअर करा

बीड दि. १९ (प्रतिनिधी ) : वाळू तस्करीचे रॅकेट चालविण्याच्या आरोपामुळे वादात अडकलेल्या गेवराईच्या तहसीलदार संदिप खोमणेच्या संदर्भाने अखेर जिल्हा प्रशासनाने कारवाईचा चेंडू शासनाच्या कोर्टात टोलवला आहे. तहसीलदार संदीप खोमणे याने वाळू माफियांना प्रत्यक्ष , अप्रत्यक्ष पाठबळ दिल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकाऱ्यांनी खोमणेच्या निलंबनाचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला आहे.
गेवरीचे तहसीलदार संदिप खोमणे हे वाळू तस्करीचे रॅकेट चालवीत असून घरकुल धारकांच्या आडून मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करी झाल्याच्या आ. विजयसिंह पंडितांच्या आरोपानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने अखेर या प्रकरणात तहसीलदार संदिप खोमणेवर  कारवाईची मानसिकता दाखविली आहे. या प्रकरणात तपासणी समितीने संदिप खोमणेवर स्पष्टपणे ठपका ठेवल्यानंतरही त्याच्यावर फौजदारी कारवाई झालेली नाही. खोमणेवरील कारवाई टाळण्यासाठी थेट मंत्रालयातून काहींनी जोर लावल्याची चर्चा होती, तसेच या प्रकरणात जिल्हा प्रशासन केवळ छोट्यांचा बाली घेत असून मोठे मासे मोकळे सोडत असल्याची चर्चा होती. या साऱ्या पार्श्वभूमीवर अखेर जिल्हा प्रशासनाने संदिप खोमणेच्या निलंबनाची शासनाला प्रस्ताव पाठविला आहे. संदिप खोमणे याने गेवराई तालुक्यात प्रत्यस्ख अप्रत्यस्खपणे वाळू माफियांना पाठबळ दिले असून त्यामुळे शासनाच्या महसुलाची मोठ्याप्रमाणावर हानी झाल्याचा ठपका ठेवत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी हा प्रस्ताव पाठविला आहे. आता शासन यावर काय कारवाई करते याकडे जिल्ह्याच्या नजरा आहेत.

आणखी एक पराक्रम , चक्क दुचाकीला वाळू वाहतुकीचे ईटीपी
 बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील वाळू तस्करीच्या सिंडिकेटचे आरोप थेट तहसीलदार संदीप खोमणेवर झाले होते. त्यानंतर प्रशासनाने कारवाईचा फार्स तर केला, मात्र तहसीलदाराला बाजूला सोडून तलाठी, कोतवाल यांच्यावर गुन्हे दाखल केले. यासाठी प्रशासनावर थेट मंत्रालयातून दबाव असल्याच्या चर्चा आहेत. त्यातच आता राक्षसभुवनच्या वाळूघाटांवरून चक्क दुचाकी वाहनांच्या क्रमांकावरून वाळू वाहतुकीच्या ईटीपी निर्गमित करण्यात आल्याचे समोर आले आहे. एखादा तहसीलदार आपल्या अधिकाराचा वापर करून काय काय पराक्रम करू शकतो हेच यातून समोर  येत आहे.

 

असली अनागोंदी अजित पवारांना पचली असती का ?
बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद राज्याच्या उपमुख्यमंत्री असलेल्या सुनेत्रा पवार यांच्याकडे आहे. आपण दिवंगत अजित पवारांचा विचार पुढे नेत  असून त्यांच्या स्वप्नातील बीड जिल्हा घडविणार असल्याचे त्या सांगतात . जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी देखील खास अजित पवारांच्या मर्जीतून जिल्ह्यात पाठविले गेले होते , मग असे असताना एखादा तहसीलदार इतकी सारी अनागोंदी करतो आणि त्याच्यावर कारवाई करण्यात जिल्हा प्रशासन हतबल होते याचा अर्थ काय ? असली अनागोंदी दिवंगत अजित पवारांना तरी पचली असती का? राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री असलेल्या सुनेत्रा पवारांनी तरी याचा विचार करावा अशी भावना सामान्यांची आहे.

 

अतिरिक्त पोलीस अधिक्षकांच्या नेतृत्वात
एस.आय.टी.स्थापन करा - आ. विजयसिंह पंडित
     राक्षसभुवन (शनिचे) येथील गोदावरी नदीपात्रात झालेल्या अवैध वाळू उत्खनन शासकीय खनिज संपत्तीची अवाढव्य चोरी, डिजिटल डाटा चोरी यांसह तहसिलदार सारख्या लोकसेवकांनी पदाचा गैरवापर करून शासनाची आर्थिक फसवणुक केल्याप्रकरणी चकलांबा पोलीस ठाण्यात दाखल गुन्हाच्या तपासासाठी अति.पोलीस अधिक्षक यांच्या नेतृत्वात एस.आय.टी. स्थापन करून त्यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास देण्याची मागणी आ. विजयसिंह पंडित यांनी केली आहे. याप्रकरणी त्यांनी प्रभारी पोलीस अधिक्षक चेतना तिडके यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिले. गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेऊन सदर गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करत असून नियमित पोलीस अधिक्षक रुजू झाल्यानंतर एस.आय.टी. बाबत कार्यवाही होईल असे आश्वासन प्रभारी पोलीस अधिक्षक चेतना तिडके यांनी दिले.

 

Advertisement

Advertisement