माजलगाव दि.१० (प्रतिनिधी): तालुक्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असलेल्या पुरुषोत्तमपुरी येथे गोदावरी नदीत भाविकांना घेऊन जाणारी बोट बुधवारी अचानक उलटल्याने मोठी दुर्घटना घडली. यामध्ये एकाचा मृत्यू तर एक अल्पवयीन मुलगा बेपत्ता असल्याचजि माहहती समोर आली आहे. बोटीत सुमारे 40 ते 50 भाविक प्रवास करत होते. बोट उलटताच सर्व प्रवासी नदीत पडल्याने एकच गोंधळ उडाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, स्वयंसेवक आणि प्रशासनाने तातडीने बचावकार्य सुरू केले. अनेक भाविकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. मात्र या दुर्घटनेत प्रणिला शेषेराव राठोड (वय 55, रा. लोणार) यांचा मृत्यू झाला. तसेच सिंधूबाई अर्जुन मवाळ (वय 75, रा. महागाव, जि. वाशिम) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या दुर्घटनेत एक अल्पवयीन मुलगा बेपत्ता झाला असून त्याचा शोध घेण्यासाठी नदीपात्रात युद्धपातळीवर शोधमोहीम राबविण्यात येत आहे. बचाव पथके, स्थानिक पोहणारे आणि प्रशासनाकडून शोधकार्य सुरू आहे.
या दुर्घटनेनंतर यात्रास्थळी सुरक्षेच्या उपाययोजनांचा अभाव असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. बोटीतून प्रवास करणाऱ्या भाविकांना लाईफ जॅकेट उपलब्ध करून देण्यात येत नसल्याची तसेच गर्दी नियंत्रणासाठी पुरेशी व्यवस्था नसल्याची तक्रार भाविकांनी व्यक्त केली. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार आणि स्थानिक आमदार यांच्याविरोधातही भाविकांनी नाराजी व्यक्त केली. सध्या घटनास्थळी मोठी गर्दी असून प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

बातमी शेअर करा
