Advertisement

संपादकीय अग्रलेख- ऐसे कैसे झाले भोंदू

प्रजापत्र | Sunday, 10/05/2026
बातमी शेअर करा

महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाचा फार मोठा वारसा आहे. भूतदया , सर्वाभूती ईश्वर पाहण्याची आणि 'कोणाही जीवाचा न घडो मत्सर ' ची शिकवण ज्या संप्रदायाने दिली, स्वतःला त्या संप्रदायाचे म्हणावविणाऱ्या संग्राम  भंडारे सारख्या विकृती जर एखाद्याच्या टीकेला हिंसेने उत्तर देण्याची, झुंडशाहीची कृती करत असतील तर वारकरी संप्रदायाची हीच शिकवण आहे का ? याचा विचार आता वारकरी संप्रदायातील धुरिणांनी करायला हवा. विकास लवांडे यांनी जे काही आरोप केले त्यावर कोणाचे काही आक्षेप असतील तर त्याला कायदेशीर मार्गाने सामोरे जाता आले असते, पण त्या ऐवजी झुंडशाहीचे प्रदर्शन करणे हा नेमका कोणता धर्म ? 'ऐसे कैसे झाले भोंदू , कर्म करोनि म्हणती साधू ' हे  संत तुकारामांनी लिहून ठेवले ते या असल्या भंडारे सारख्या विकृतीसाठीच असावे.

महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची मोठी परंपरा आणि संत विचारांचा फार मोठा वारसा आहे. ज्ञानेश्वर , एकनाथ, नामदेव, तुकाराम अशा सर्व संतांनी महाराष्ट्राच्या मराठी मनाची माणुसकीची मशागत केली तो वारकरी धर्म. कोणाही जीवाचा न घडो मत्सर येथून सुरुवात होणारी या धर्माची शिकवण, सर्वांप्रती यशावर पाहण्याची, परमत नसहिष्णुता शिकविणारी या वारकरी संप्रदायाची ओळख. अगदी लोकांच्या बोलण्याने दिग्मूढ होऊन ताटी लावून बसलेल्या संत ज्ञानेश्वरांना देखील 'योगी पावन मनाचा । साहे अपराध जनाचा ।।विश्वरागे झाले वन्ही । संती सुखे व्हावे पाणी ।।शब्द शस्त्रे झाली क्लेश । संती मानवा उपदेश' हे अभंग सांगणाऱ्या संत मुक्ताबाईंचा विचार म्हणजे वारकरी संप्रदाय किंवा वारकरी धर्म . स्वतःला त्या वारकरी संप्रदायाचा म्हणवणारा कोणी संग्राम  भंडारे राष्ट्रवादीचे प्रवक्ते असलेल्या विकास लवांडे यांना अडवून त्यांच्या अंगावर शाई फेकतो, त्यांना धमक्या देतो आणि वरतून त्याचे जाहीर प्रदर्शन केले जाते याला काय म्हणावे ? ही असली झुंडशाही वारकरी संप्रदायाच्या कोणत्या शिकवणीत बसते ? या विकृतींनी कधी खरोखर संत विचार किमान वाचले तरी आहेत का ? काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या वतीने विकास लवांडे यांनी वारकरी संप्रदायात काही अपप्रवृत्ती घुसल्या आहेत असे सांगत २० कीर्तनकारांची नावे जाहीर केली. विकास लवांडे यांनी केलेल्या या आरोपावर कोणाचे काही आक्षेप असल्यास त्यांनी देखील त्यांना संवैधानिक मार्गाने उत्तर देणे अपेक्षित आहे. पण कोणी टीका केली म्हणून 'आमचे मायबाप, आमचे दैवत यांच्याबद्दल तू असे काही बोलतोय कसा ? ' असे म्हणत त्याच्या अंगावर शाई फेकणे , त्याला धमक्या देणे ही कोणती भूतदया ? ही कोणती परमत सहिष्णुता ? वारकरी संप्रदायातील जे कोणी म्हणून धुरीण आहेत त्यांनी आता याबद्दल व्यक्त व्हायला हवे . असल्या विकृती आणि झुंडशाही जात स्वतःला वारकरी आणि महाराज म्हणवून घेणार असतील तर यामुळे महाराष्ट्राचे वैभव आणि आस्था असलेल्या वारकरी संप्रदायाची बदनामी होत आहे असे या क्षेत्रातील धुरिणांना वाटत नाही काय ?
मुळात सम्राट भंडारे सारख्या विकृती कोणत्याच संप्रदायाच्या असू शकत नाहीत, त्या विकृती केवळ पोटार्थी असतात, काहीतरी भडकाऊ बोलायचे , वागायचे आणि त्यातून स्वतःचा चरितार्थ चालवायचा हा यांचा धंदा, म्हणूनच मग असल्या विकृती अनेकदा 'नथुरामी ' होण्याची जाहीर भाषा करतात , मग असल्या विकृतींना 'आपले' म्हणून संरक्षित करायचे का असल्या विकृती ठेवण्यासाठी पुढाकार घ्यायचा याचा विचार आता वारकरी संप्रदायातील सर्वच प्रमुख धुरिणांनी करणे आवश्यक आहे. कोणावर शाई फेकून किंवा कोणाला धमकावून पुन्हा ' नाठाळाच्या माथी हाणू काठी ' असल्या अभंगांचा आधार घेण्याचा प्रयत्न देखील पोरकटपणाचे आणि वारकरी संप्रदायाचा , संत विचारांचा अभ्यास किती आहे याचेच प्रदर्शन करणारे आहे. संत ज्ञानेश्वर असतील किंवा संत तुकाराम, यांचा ज्यांनी ज्यांनी छळ केला, त्यांनी काही त्या छळ करणारांना झुंडशाहीची भाषा कधी वापरली नव्हती . संत एकनाथ त्यांना पीडा देऊ पाहणारांशी कसे वागले हे साऱ्या महाराष्ट्राला माहित आहे, हा खरा वारकरी धर्म आहे. मग अशा साऱ्या संत परंपरेत ही भंडारे  विकृती कोठे बसते ? विचारांचा सामना विचारांनी करण्याची मोठी शक्ती वारकरी संप्रदायात आहे. अगदी 'वेदांचा तो अर्थ आम्हाशीच ठावे ' असे सांगत आम्ही वेदांचा देखील मानवतेच्या दृष्टिकोनातील अर्थ लावू शकतो हे आमच्या संतांनी दाखवून दिले आहे असे असताना, वारकरी संप्रदायाचा हा गौरवशाली वारसा असताना भंडारे सारख्या विकृती या वारकरी संप्रदायात फोफावू द्यायच्या का ? याचा विचार एकूणच समाजानेच करण्याची वेळ आली आहे. असल्या विकृतींबद्दल राष्ट्रसंत तुकारामांनी '…. तरी श्वान सहज वेश त्याचा ।तेथें अनुभवाचा काय पंथ ।।वाढवुनी जटा फिरे दाही दिशा ।तरी जंबुवेषा सहज स्थिती ।। हे महाराष्ट्राला शिकवून ठेवले आहे, त्यामुळे असल्या विकृतींना ना वारकरी संप्रदायात, ना समाज धर्मात , ना महाराष्ट्र  धर्मात, कोठेच स्थान मिळत काम नये. असल्या विकृतींचा होईल तितक्या जोरकसपणे निषेधच करायला हवा.  

 

Advertisement

Advertisement