Advertisement

संपादकीय अग्रलेख- हेकेखोरीला चपराक

प्रजापत्र | Thursday, 30/04/2026
बातमी शेअर करा

दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे रिक्त झालेल्या बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोग ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीत दिवंगत संतोष देशमुख यांच्या पत्नी आश्विनी देशमुख यांचा पराभव झाला. गावकरी यावेळी संतोष देशमुख यांचे जुने राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या स्वरूपानंद देशमुख यांच्या पाठीशी राहिले.जे गाव संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर देशमुख कुटुंबाच्या न्यायासाठी एकजूट होऊन रस्त्यावर उतरले होते, त्याच गावाने न्यायाचा लढा आणि सहानुभूतीच्या नावाखालचे राजकारण यात फरक आहे आणि न्यायाच्या लढ्यासाठी सोबत आहोत म्हणजे तुमच्या राजकारणासाठी तुमच्यामागे फरफटत जाणार नाही हे दाखवून दिले आहे. खरेतर हा पराभव आश्विनी देशमुख यांचा नाहीच,तर हा पराभव आहे धनंजय देशमुख यांचा आणि त्यांच्या 'मी म्हणतो ते जगातले अंतिम सत्य' या हेकेखोरीचा.
 
 खरेतर एखाद्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीचा निकाल हा संपादकीय लेखाचा विषय होण्याचे तसे काही कारण नाही, मात्र मस्साजोगच्या सरपंचपदाची पोटनिवडणूक त्याला अपवाद असेल.मुळात ही निवडणूक ज्या पार्श्वभूमीवर झाली आणि निवडणुकीच्या अगोदर एकूणच राजकीय,सामाजिक परिघात जे काही घडले, बिघडले, त्यामुळे या निवडणुकीची आणि या निवडणुकीच्या निकालाच्या धड्याची दखल घेणे भाग आहे.
आवादा या ऊर्जा कंपनीच्या मस्साजोग शिवारातील प्रकल्पाशी संबंधित वादातून मस्साजोगचे तत्कालीन सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाली.ज्या पद्धतीने ही हत्या झाली, त्या हत्येचा साऱ्या राज्यातून निषेध झाला,खरेतर त्या हत्येची जी दृश्ये समोर आली होती, त्या दृशांनी कोणताही व्यक्ती विचलित आणि अस्वस्थ व्हावा अशीच ती दृश्ये होती.त्यामुळेच या हत्येतील आरोपींच्या विरोधात साहजिकच राज्यभरात जनमत निर्माण झाले आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबाप्रती एक सहानुभूतीची भावना देखील.यातील गुन्हेगारांना कठोरातील कठोर शासन व्हावे मयत संतोष देशमुख यांना न्याय मिळावा अशी भावना संपूर्ण राज्याची होती आणि आहे. काहींनी या हत्येतही 'मराठ्यांचं पोरग गेलं' असा सूर लावला तरीही पक्षीय, जातीय आणि किंवा आणखी कोणत्याही मर्यादांपलीकडे जाऊन प्रत्येकाची संतोष देशमुख हत्येतील जे कोणी दोषी सिद्ध होतील त्यांना कठोर शासन व्हावे हीच भावना आहे. आणि याच भावनेतून देशमुख कुटुंबाच्या न्यायालयीन लढ्यासाठी सारे मस्साजोग गाव एकजूट होऊन त्या कुटुंबाच्या मागे उभे राहिले.
मात्र राजकारण आणि न्यायाचा लढा,राजकारण आणि भावनिकता या दोन गोष्टींची गल्लत करायची नसते,संतोष देशमुख कुटुंबाकडून, कुटुंबाकडून म्हणण्यापेक्षाही धनंजय देशमुख यांच्याकडून ती गल्लत झाली.संतोष देशमुख यांच्या हत्येचे दुःख सर्वांना आहेच,मात्र एकीकडे धनंजय देशमुख आपल्याला फार दुःख झाल्याचे सांगत असतानाच दुसरीकडे राज्यभरातील अन्यायाविरुद्धच्या लढ्याचे जणू 'प्रतीक' बनू पाहत होते.राज्यात कोठे काही घडले की त्यांनी तेथे भेट द्यायची,ठिकठिकाणच्या हरिनाम सप्ताहाला भेट द्यायची, विवाह सोहळ्यात त्यांच्या आगमनाची प्रतीक्षा केली जायची,मागच्या काही काळात धनंजय देशमुख शब्द थोडे कठोर असले तरी एखाद्या 'सेलेब्रिटी' सारखे वागत असल्याचे राज्याने पाहिले.त्यांनी तसे वागायला देखील कोणाची हरकत नाही,शेवटी दुःख कितीही मोठे असले तरी त्याला कुरवाळत बसून चालत नसते,त्यातून बाहेर पडावेच लागते,रोजचा दिनक्रम,न्यायालयीन लढाई लढवीत लागते, त्यामुळे धनंजय देशमुख यांच्या राज्यव्यापी दौऱ्यांबद्दल देखील आक्षेप वाटावा असे काही नाही.
गफलत आणि गल्लत झाली ती मस्साजोगच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत.संतोष देशमुख यांनी गावासाठी खूप काही केले आहे, ग्रामपंचायतीत पुरस्कार ठेवायला जागा नाही, इतके पुरस्कार गावाला मिळवून दिले असे धनंजय देशमुख यांचे म्हणणे,ते खरे असेलही, त्याची पडताळणी देखील करण्याची काही आवश्यकता नाही. संतोष देशमुख यांनी गावासाठी बलिदान दिले हे धनंजय देशमुख यांचे म्हणणे देखील मान्य करता येईल,पण म्हणून आता त्यांच्यानंतर गावातील कोणी निवडणुकीचं लढवायची नाही आणि त्यांच्या कुटुंबालाच निवडणुकीची संधी द्यायची अशी भूमिका कोणत्याच गावात पटणारी नसते.न्यायाचा लढा वेगळा असतो आणि गावचे राजकारण वेगळे असते. कबड्डीचे नियम खो-खो ला लावता येत नसतात.प्रत्येक गोष्टीचे स्वतःचे असे काही नियम असतात आणि त्या गोष्टी त्याच नियमांनी होणे अपेक्षित असते.मरणा तोरणाला सारे गाव सोबत येते म्हणून उद्या तुमच्या प्रत्येक गोष्टीत गावाने सोबत असलेच पाहिजे अशी अपेक्षा करणे जसे गैर, तसे पोटनिवडणूक कोणी लढवू नये असे म्हणणे,ते देखील अशा व्यक्तीने जी भावाच्या मृत्यूचे दुःख पचवून राज्यभरात फिरते, त्या व्यक्तीने निवडणूक बिनविरोध व्हावी असे म्हणणे म्हणजे चुकीचेच होते.बरे बिनविरोध करायचीच असेल तर आता आम्हाला संधी द्या असे मागच्या वेळी पराभूत झालेल्या व्यक्तीला वाटणार असेल तर त्यात गैर काय ? पण आमचा भाऊ गेलाय म्हणून पुढचे सरपंचपद आमच्याच घरात पाहिजे हा अट्टाहास आणि मग त्यासाठी पुन्हा भावाच्या मृत्यूच्या भावनिकतेवरच निवडणूक फिरविण्याचे प्रयत्न, न्यायाचा लढा म्हणताना एखाद्या जातील,एखाद्या व्यक्तीला कसेही करून बदनाम करण्याचे प्रयत्न, कोणाला तरी हाताला धरून ऑडिओ क्लिपचे राजकारण आणि गावातीलच मतदारांवर 'तुम्ही आमुक ठिकाणचे हस्तक आहात' असे सरेआम सुनावणे, हे सारे गावाला कसे पटावे ? या वागण्यात गावकऱ्यांना अहंकार आणि हेकेखोरी वाटली असेल तर यात चुकीचे काय ? त्यातूनच गावकऱ्यांनी 'न्यायाचा लढा' आणि गावचे राजकरण वेगवेगळे आहे अशी भूमिका घेतली यातून खरेतर गावाची राजकीय समाज किती प्रगल्भ आहे हेच समोर आले आहे.येथे आश्विनी देशमुख या उमेदवार होत्या तरी निवडणूक धनंजय देशमुख यांचीच मानली जात होती. आणि त्यांच्यातील गावकऱ्यांना विश्वासात घेण्याऐवजी गावाला गृहीत धरण्याचा अहंकार आणि हेकेखोरी जी होती, त्या हेकेखोरीला ही चपराक आहे. या निवडणुकीमुळे संतोष देशमुख हत्येच्या न्यायालयीन लढ्यात देशमुख कुटुंब एकटे पडले असे समजण्याचे काही कारण नाही, ते होणार नाही, मात्र राजकारण आणि भावनिकता यांची सरमिसळ नको आणि बाहेरच्या 'दादां'ना सोबत घेऊन गावची 'खिंड' लढविता येत नसते,शेवटी गाव सर्वांना ओळखून असते हाच संदेश या निकालाने दिला आहे.

Advertisement

Advertisement