बीड: संतोष देशमुख (Santosh Deshmukh murder)हत्या प्रकरणात सुरू असलेल्या खटल्यात बचाव पक्षाला पुरावे देण्याची पूर्तता झाली नसल्याचा बचाव पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत आजची दोषारोप निश्चिती पुढे ढकलली आहे,यात आता २३ रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयात सुरू आहे. आज (दि.१९) त्यात दोषारोप निश्चिती होणे अपेक्षित होते. मात्र आज पुन्हा बचाव पक्षाने दोषारोप निश्चितीपूर्वी पुरावे देण्याच्या तरतुदीची पूर्तता झाली नसल्याचे सांगितले. हल्ल्याचे व्हिडिओ उच्च न्यायालयात दाखवले जातात, मात्र बचाव पक्षाला दिले जात नाहीत, हे कायदेशीर नसल्याचे सांगितले. बीएनएसएस च्या कलम २३० ची पूर्तता झाल्याशिवाय दोषारोप निश्चितीची घाई अभियोगपक्ष का करत आहे,असा युक्तिवाद आरोपींच्या वतीने करण्यात आला. बचाव पक्षाला संबंधित व्हिडिओ लगेच उपलब्ध करून दिले जातील तसेच लॅपटॉप संबंधी अहवाल यायला ३० दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे. अहवाल आल्याबरोबर तो बचाव पक्षाला दिला जाईल असे तपास अधिकारी आणि सहाय्यक सरकारी वकिलांनी सांगितल्यानंतर या प्रकरणाची पुढील सुनावणी २३रोजी होणार असल्याचे न्यायालयाने म्हटले.
उज्वल निकमांना बदलण्यासाठी अर्ज
दरम्यान या प्रकरणातील सरकारी वकील उज्वल निकम हे भाजपचे खासदार असून त्यांची या खटल्यात नियुक्ती भाजप आमदारांच्या शिफारशीवर झाली असल्याचे सांगत आरोपी क्रमांक ३ ते ७ यांनी उज्वल निकम यांची नियुक्ती रद्द करण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज केला आहे. त्यावर न्यायालयाने उज्वल निकम यांना त्यांचे म्हणणे मांडण्यासाठी सांगितले. अशा कोणत्याही अर्जाला कायदेशीर आधार नाही, किंवा ते या न्यायालयाच्या अधिकारक्षेत्रात येत नसल्याची भूमिका घेतली.

