Advertisement

क्षीरसागरांची कोंडी , पंडितांच्या पथ्यावर !  

प्रजापत्र | Sunday, 16/11/2025
बातमी शेअर करा

संजय मालाणी
बीड दि. १५ : बीड नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने 'शिवछत्र ' परिवार अर्थात पंडित बंधूंना बीडच्या राजकारणात थेट हस्तक्षेप करण्याची सक्रिय होण्याची संधी मिळाली आहे. या माध्यमातून बीड मतदारसंघात आता पंडितांचा स्वतःचा असा गट त्यांना निर्माण करता येईल असे चित्र आहे. क्षीरसागर कुटुंबाची झालेली राजकीय कोंडी पंडितांच्या राजकीय पथ्यावर पडत असल्याचे चित्र आता बीड मतदारसंघात पाहायला मिळेल.
बीड जिल्ह्याच्या राजकारणात क्षीरसागर आणि पंडित या दोन राजकीय घराण्यांचे संबंध तसे कायमच राजकीय विरोधाचेच राहिले. बहुतांश वेळा एकाच पक्षात राहून किंवा वेगवेगळ्या पक्षात असतानाही या दोन राजकीय कुटुंबांमध्ये फारशी राजकीय मैत्री टिकली नाही. काही प्रसंगातील पक्षाची भूमिका म्हणून काही प्रासंगिक करार या दोन कुटुंबांमध्ये झाले, नाही असे नाही, पण ते तेव्हढ्यापुरतेच. जसे बीडच्या राजकारणात दीर्घकाळ क्षीरसागर-मुंडे मैत्रीचे दाखले दिले जायचें, तसे बीड जिल्हा क्षीरसागर-पंडितांकडे पाहतो ते राजकीय प्रतिस्पर्धी म्हणूनच.
शिवाजीराव पंडितांपासून वेगळे निघाल्यावर बदामराव पंडितांना क्षीरसागर कुटुंबाने दिलेले बळ असेल किंवा एका लोकसभा निवडणुकीत शिवाजीराव पंडितांनी 'टोपी ' काढून केलेली घोषणा , अमरसिंह पंडितांना जिल्हापरिषदेचे अध्यक्ष होण्याची इच्छा असताना क्षीरसागर गटाने घेतलेली भूमिका असेल किंवा आणखी कोणताही प्रसंग , जिल्ह्याच्या राजकारणात क्षीरसागर -पंडितांमधील राजकीय कटुताच नेहमी चर्चिली गेली.
बदामराव पंडितांच्या माध्यमातून क्षीरसागर कुटुंब गेवराई मतदारसंघात लक्ष घालते म्हणून बीड मतदारसंघात आपला 'उपद्रव' म्हणा किंवा 'प्रभाव' दाखविण्याची इच्छा तशी पंडित कुटुंबाबाची कायमच राहिलेली, पण कधी पक्षाने रोखले म्हणून असेल किंवा कधी अन्य कोणत्या कारणांनी , पंडितांना तसे ते तितकेसे जमले नव्हते. मात्र नंतरच्या काळात , विशेषतः मागच्या एका दशकात क्षीरसागर कुटुंबातच राजकीय फूट पडली , क्षीरसागर म्हणून असलेली शक्ती विभागली, त्यावेळी अमरसिंह पंडितांनी आ. संदीप क्षीरसागर यांना साथ देण्यात कसर सोडली नव्हती. मध्यंतरी पुन्हा भूमिका वेगळ्या झाल्या , मात्र या पाडव्याला आ. संदीप क्षीरसागर शिवछत्रावर येऊन गेले, यात राजकारण नाही असे कोण म्हणणार ?
तर असे राजकीय नाते असल्यानेच आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत डॉ. योगेश क्षीरसागर यांची होत असलेली कोंडी पंडित पाहत होतेच. किंबहुना बीड शहरातील 'आपल्या ' गटासाठी आ. विजयसिंह पंडित यांनी पक्षाच्या बैठकीत देखील खिंड लढविली होतीच. त्यातूनच डॉ. योगेश क्षीरसागर यांनाच पक्षाच्या पदाचा राजीनामा देण्याची वेळ आली आणि आता बीड नगरपालिकेची सूत्रे थेट 'शिवछत्र 'वरून हालत आहेत. यापूर्वी काही निवडणुकांमध्ये क्षीरसागरांच्या विरोधात आपली शक्ती क्षीरसागर विरोधकांना देण्याची भूमिका पंडितांनी घेतली होतीच, आता मात्र थेट बीड विधानसभेत राष्ट्रवादीची सूत्रे पंडित कुटुंबाकडे आली आहेत. भविष्यातील बीड विधानसभा मतदारसंघातील राजकीय बदलांची ही नांदी ठरली तर आश्चर्य वाटायला नको.

Advertisement

Advertisement