Advertisement

 गोपीनाथ मुंडेंपासून दूर जात धनंजय मुंडेंनी दीपक देशमुखांना केले होते नगराध्यक्ष

प्रजापत्र | Tuesday, 11/11/2025
बातमी शेअर करा

 बीड दि. १० (प्रतिनिधी ) : राजकारणात 'माझे मीठच आळणी आहे' असे दिवंगत गोपीनाथ मुंडे नेहमी म्हणायचे , आज तशाच काहीशा भावना कदाचित आ. धनंजय मुंडेंच्या असाव्यात. २०११ मध्ये गोपीनाथ मुंडेंपासून वेगळे होत ज्या दीपक देशमुखांना धनंजय मुंडेंनी नगराध्यक्ष केले होते, तेच दीपक देशमुख आज आ. धनंजय मुंडेंना सोडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत गेले आहेत.
      दीपक देशमुख हे तसे सुरुवातीपासून धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय. २०११ च्या नगरपालिका निवडणुकीत त्यावेळी गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे भाजपातच  होते. त्या निवडणुकीत धनंजय मुंडे दीपक देशमुखांना पक्षाचे तिकीट देऊ शकले नाहीत , मात्र दीपक देशमुख अपक्ष निवडून येतील हे मात्र त्यावेळी भाजपचे विधानपरिषद सदस्य असलेल्या धनंजय मुंडे यांनी पाहिले. त्या निवडणुकीत सभागृहात भाजपचे १७ सदस्य निवडणून आले, दीपक देशमुख अपक्ष होते, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी ७ सदस्य निवडणून आले होते. त्यावेळी परळीत भाजपचा नगराध्यक्ष होईल हे निश्चित मानले जात असतानाच मोठा राजकीय भूकंप म्हणावा अशी घटना घडली . भाजपातून धनंजय मुंडेंना मानणारे १२ नगरसेवक बाजूला झाले आणि त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने अपक्ष असलेल्या दीपक देशमुखांना नगराध्यक्ष  केले. धनंजय मुंडे तसे २००९ पासून पक्षात काहीसे नाराज होते , मात्र त्यांनी पहिले जाहीर बंड केले ते दीपक देशमुखांना नगराध्यक्ष करायचे म्हणून. त्यावेळी थेट गोपीनाथ मुंडेंच्या कुटुंबात आणि परळीत असे काही होईल असे कोणालाच वाटले नव्हते. मात्र धनंजय मुंडेंनी भाजपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि त्याला अजित पवारांनी मदत केली. त्यातून दीपक देशमुखांच्या गळ्यात एकमेव अपक्ष असताना अध्यक्षपदाची माळ पडली. देशमुख मुंडे मैत्रीचा हान किस्सा परळीत सर्वश्रुत आहे.
आज त्याच दीपक देशमुखांनी धनंजय मुंडेंची साथ सोडली, आणि केवळ साथ सोडलीच नाही तर आता दीपक देशमुखांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका देखील केली आहे. त्यामुळेच ज्या ज्या वेळी आपणच मोठे केलेली माणसे सोडून जायची, त्या वेळी दिवंगत गोपीनाथ मुंडे 'माझे मीठच आळणी ' असे म्हणायचे,तीच काहीशी भावना आता धनंजय मुंडेंची असायला हरकत नाही.

 

Advertisement

Advertisement