बीड: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी आ.धनंजय मुंडेंवर हत्येचा कटात सहभागी असल्याचा आरोप केल्यानंतर आ. धनंजय मुंडे यांनी देखील जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. या संपुर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशीच झाली पाहिजे त्यासोबतच कथीत कट प्रकरणात पकडलेल्या आरोपींची, माझी आणि जरांगेंचीही नार्कोटेस्ट झाली पाहिजे अशी मागणी आ. धनंजय मुंडे यांनी केली आहे.
मनोज जरांगे यांच्या हत्येच्या कटाच्या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत जरांगे यांनी आ.धनंजय मुंडेंवर आरोप केले होते. आ. मुंडे यांनी त्याला पत्रकार परिषदेतूनच उत्तर दिले. कार्यकर्ते तुमचेच, कबुली जबाब देणारेही तुमचेच आणि आरोप माझ्यावर, हा काय प्रकार आहे?हाकेंना मारहाण कोणी केली, वाघमारे, करनर यांना मारणारे कोण?लोकांची घरं जाळणारी पिलावळ कोणाची? याला संपवून टाकीण,त्याला संपवून टाकीण ही भाषा कोणाची? आम्ही तर असं कधी बोललो नाही. मुख्यमंत्र्यांची आयमाय काढ,कोणाच्याही मायबहिणघबद्दल काहीही बोल हे कसं चालत? मुंडेंच बी संपवा, वंजारी जातीच बी संपवा अशा धमक्या दिल्याजातात, सरकार साधी एनसीही घेत नाही. इथली सारी यंत्रणा जरांगें ना घाबरतेय, म्हणून आता या कट प्रकरणाची चौकशी सीबीआयने करावी अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांना करत आहोत आणि त्या शिवाय धनंजय मुंडे स्वस्थ बसणार नाही असे आ.मुंडे म्हणाले.
आपले आणि जरांगेंचे काहीच वैर नाही, पण ओबीसींच्या एल्गार मेळाव्यात मी जे प्रश्न विचारले त्याची उत्तरे देण्याची हिंमत जरांगेमध्ये नाही म्हणून असली खोटीनाटी प्रकरणे काढली जात आहेत. मराठा समाजाचा फायदा ओबीसी आरक्षणात का इडबल्युएस मध्ये याचे उत्तर जरांगेंनी द्यावे, तारीख, वेळ ठिकाण त्यांनी ठरवावे, मी पुराव्यासह चर्चेला यायला तयार आहे असे आव्हानही त्यांनी दिले. मी ओबीसींच्या हक्काचे रक्षण करण्यासाठी बोललो म्हणून माझ्यासारख्या बहुजन कार्यकर्त्याला आयुष्यातून संपविण्याचा प्रयत्न जरांगे करित आहेत असेही धनंजय मुंडे म्हणाले.

