Advertisement

४०  वर्षात प्रथमच नगरपालिका निवडणुकीत भारतभूषण क्षीरसागर नसणार सक्रिय

प्रजापत्र | Wednesday, 05/11/2025
बातमी शेअर करा

  बीड दि. ४ (प्रतिनिधी): बीड नगरपालिका आणि डॉ. भारतभूषण क्षीरसागर हे जणू एक समीकरण असल्याचे मागच्या ४ दशकात राहिलेले आहे. १९८४ ला डॉ. भारतभूषण क्षीरसागर पहिल्यांदा नगराध्यक्ष झाले तेव्हापासून ते मागच्या नगरपालिका निवडणुकीपर्यंत ते नगरपालिका निवडणुकीत सक्रिय असायचे, किंबहुना त्यांची ओळखी शहरात 'अध्यक्ष' म्हणूनच राहिली. यावेळी मात्र ४० वर्षात पहिल्यांदाच प्रकृतीच्या कारणामुळे ते नगरपालिका निवडणुकीत सक्रिय नसतील. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत बीड नगरपालिकेची निवडणूक लढविताना डॉ. योगेश क्षीरसागर व डॉ. सारिका क्षीरसागर यांचा कस लागणार आहे.
बीड नगरपालिका आणि क्षीरसागर कुटुंब यांचा संबंध मागच्या चार दशकात अत्यंत जवळचा राहिला. काही अपवाद वगळता या नगरपालिकेवर कायम डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांचे वर्चस्व राहिले. युती सरकारच्या काळातील काही काळ वगळता ते स्वतः किंवा त्यांचे समर्थक हेच नगरपालिकेचे अध्यक्ष राहिले. अगदी जनतेतून नगराध्यक्षाची निवडणूक झाली, त्यावेळी देखील डॉ. भारतभूषण क्षीरसागर हेच निवडणून आले. डॉ. भारतभूषण  क्षीरसागर यांची ओळख शहरात 'अध्यक्ष' म्हणून व्हावी इतके ते नगरपालिकेच्या राजकारणाशी एकरूप होते. नगरपालिकेत बहुमत असो अथवा नसो, नगरपालिकेचा कारभार 'हाकून' नेण्यामध्ये देखील त्यांचा हातखंडा असायचा आणि काही मोजके अपवाद वगळता कोणी दीर्घकाळ त्यांचा विरोधक राहणार नाही याचीही तजवीज ते कायम करायचे. त्यातूनच नगरपालिकेच्या राजकारणावर प्रचंड पगडा असलेला नेता हीच त्यांची ओळख राहिली. मागच्या काही वर्षांपासून ते प्रकृतीच्या कारणावरून सार्वजनिक व राजकीय जीवनातून अलिप्त झाले आहेत, त्यामुळे ४० वर्षात प्रथमच बीड नगरपालिकेच्या निवडणुकीत ते सक्रिय नसतील.

 

२०१६ ची निवडणूक ठरली होती आव्हान
नगरपालिकेच्या राजकारणात मुरलेल्या डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्यासाठी २०१६ ची निवडणूक मात्र आव्हान ठरली होती. त्याला कारण होते क्षीरसागर कुटुंबात पडलेली राजकीय फूट. २०१६ मध्येच पुतणे संदीप क्षीरसागर यांनी क्षीरसागर कुटुंबात वेगळी राजकीय वाट निवडली आणि त्यातही धक्कादायक म्हणजे काकू नाना आघाडीच्या माध्यमातून डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्या विरोधात त्यांचे सख्खे बंधू रवींद्र क्षीरसागर निवडणुकीच्या रिंगणात उतरले. या निवडणुकीत त्यांनी निसटता का होईना विजय मिळविला, मात्र नगरपालिकेच्या सभागृहात त्यांना सुरुवातीला बहुमत मिळविता आले नाही. ५० सदस्यांच्या सभागृहात डॉ. क्षीरसागर यांचे केवळ १७ सदस्य निवडणून आले, तर काकू नाना आघाडीचे २० सदस्य निवडून आले. एमआयएमने ११ जागा जिंकल्या. पुढे एमआयएममध्ये फूट पडेपर्यंत सभागृह चालविताना डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांना मोठी कसरत करावी लागली होती.

 

योगेश आणि सारिका क्षीरसागर यांचा लागणार कस  
बीड नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी डॉ. भारतभूषण क्षीरसागर सक्रिय नाहीत आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचा राजकीय निर्णय अद्याप झालेला नाही, अशा परिस्थितीत नगरपालिकेची निवडणूक लढविताना डॉ. योगेश क्षीरसागर आणि डॉ. सारिका क्षीरसागर या दाम्पत्याचा कस लागणार आहे. तसे २०१६ मध्येच स्वीकृत सदस्य म्हणून डॉ. योगेश क्षीरसागर यांचा नगरपालिकेच्या राजकारणात प्रवेश झाला होता , त्यांनी मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीतही ९३ हजार मते मिळविली , पण त्या प्रत्येक टप्प्यावर डॉ. भारतभूषण किंवा माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर त्यांच्यासोबत होते. यावेळी मात्र जयदत्त क्षीरसागर यांनी राजकीय निर्णय घेतला नाही, तर बीड शहरातील २६ प्रभागातील उमेदवारांची मोट बांधणे , पक्षांतर्गत विरोधकांच्या कुरघोड्यांना तोंड देणे आणि आ. संदीप क्षीरसागर यांच्यासारख्या  तगड्या विरोधकांच्या राजकीय चालींना उत्तर देताना मात्र डॉ. योगेश आणि डॉ. सारिका क्षीरसागर यांचा कस लागेल.

 

Advertisement

Advertisement