बीड दि.३१(प्रतिनिधी) : परळी आणि माजलगाव शहरात महिलांच्या गळ्यातील सोन्याच्या चैन हिसकावणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवार (दि.३०) रोजी परळीत सापळा रचून अटक केली. त्यांच्या ताब्यातून सोन्याचे दागिने आणि स्पोर्ट बाईक असा एकूण २ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
माजलगाव शहर आणि परळी शहर पोलिस ठाण्यात महिलांच्या गळ्यातून चैन हिसकावल्याचे गुन्हे दाखल होते. पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी जिल्ह्यातील चोरी व जबरी चोरीचे गुन्हे उघड करण्याचे आदेश दिले होते.त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि सुशांत सुतळे यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपास केले. दरम्यान विश्वसनीय माहिती मिळाली की दोन्ही आरोपी नविन थर्मल कॉलनी, परळी येथे चोरीचे सोने विक्रीस येणार आहेत.पथकाने सापळा रचून स्पोर्ट बाईकवर आलेल्या दोघांना थांबवून ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी नावे गुलामरज्जा मजलुम सय्यद वय 26 आणि मुस्लीम नासेर वेग वय 43 दोन्ही रा. लोणी काळभोर, ता. हवेली, जि. पुणे सध्या हमु ईराणी गल्ली, परळी अशी सांगितली.त्यांच्या ताब्यातून माजलगाव येथील चोरीतील २४ ग्रॅम सोन्याची बोरमाळ (किंमत अंदाजे १.२५ लाख रुपये), परळी येथील गुन्ह्यातील ४.५ ग्रॅम सोन्याचा गंठण तुकडा (किंमत अंदाजे ५० हजार रुपये) तसेच गुन्ह्यात वापरलेली स्पोर्ट बाईक MH-०५-AA-०८२६असा एकूण २ लाख ९५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दोन्ही आरोपी व मुद्देमाल परळी शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. या कारवाईत अप्पर पोलीस अधीक्षक चेतना तिडके,पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सुशांत सुतळे, मारूती कांबळे, रामचंद्र केकान, विष्णु सानप, गोविंद भताने आणि सचिन आंधळे यांनी ही कामगिरी केली.

