Advertisement

संपादकीय अग्रलेख -विनोद का आचरटपणा?

प्रजापत्र | Friday, 31/10/2025
बातमी शेअर करा

निवडणुकीमध्ये चपटी, बोटी आणि लक्ष्मी दर्शनाचा विषय आपण विनोद म्हणून आणि कार्यकर्त्यांना हसविण्यासाठी बोललो होतो, मी अशा निवडणुका लढविल्या असे मी बोललोच नाही असे म्हणत  राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी अखेर अपेक्षेप्रमाणे  आपल्या विधानावरून पलटी मारली आहे. अर्थात आ. सोळंकेच काय, कोणत्याही राजकीय व्यक्तीकडून यापेक्षा वेगळी अपेक्षा करणे देखील भाबडेपणाचे ठरेल. त्यामुळे आ. सोळंके यांच्या घुमजावमध्ये अनपेक्षित काहीच नाही, फक्त विषय इतकाच आहे, आ. सोळंके ज्याला विनोद किंवा कार्यकर्त्यांना हसविण्यासाठीची कृती म्हणतात तो शुद्ध जनतेला फसविण्यासाठीचा आचरटपणा आहे.

 

राजकारणात विनोदाची परंपरा फार जुनी आहे. मात्र त्या विनोदाला काही मर्यादा असतात. राजकारणात बोलू नये ते बोलायचे आणि नंतर ते अंगलट येणार असे वाटताच त्याला विनोदाचे नाव द्यायचे हा प्रकार मात्र आताशा सुरु झालेला आहे. राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या बाबतीत तर आता असा प्रकार नेहमीच झाला आहे. काहीतरी बोलून जायचे , आणि नंतर ' मी  ते बोलण्याच्या ओघात बोलून गेलो' किंवा 'मी विनोद निर्मितीसाठी बोललो' असे काही सांगायचे हे आ. प्रकाश सोळंके यांना नवीन नाही. स्थानिक निवडणुकीसाठी कार्यकर्ता बैठकीत 'चपटी , बोटी आणि लक्ष्मी दर्शनाचे धडे ' देतानाचा  त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हाच , यावर त्यांची प्रतिक्रिया 'विनोद ' किंवा अशाच काही धाटणीतली असणार हे अपेक्षिले गेले होतेच. त्याबाबतीत आ. सोळंके यांनी मतदारांचा अपेक्षाभंग केला नाही हे महत्वाचे.
 

मुळात विनोद, अहंकार , आचरटपणा आणि टगेगिरी याच्या ज्याच्या त्याच्या मर्यादा आहेत. विनोद हा निष्कपट असतो, त्यात केवळ समोरच्याला हसविण्याचा  हेतू असतो, विनोदाच्या नावाखाली काही तरी भलतेच शिकवायला किंवा बोलायला लागले तर त्याचा 'शिमगा ' व्हायला वेळ लागत नाही. आज राजकारणात अनेकांनी तो शिमगा सुरु केला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीत तो काहीसा अधिक आहे, इतकेच . आ. प्रकाश सोळंके जे काही बोलले ते राजकारणातील ढळढळीत सत्यच आहे, हे 'प्रजापत्र'ने देखील मागच्या संपादकीयमध्ये मांडलेच आहे. पण एकदा हे राजकारणातील कटुसत्य बोलल्यानंतर त्याला पुन्हा विनोदाचे नाव देणे हा मात्र शुद्द आचरटपणा आहे. असा आचरटपणा करायला जो एक राजकीय कोडगेपणा लागतो , तो कोडगेपणा अजित दादांच्या राष्ट्रवादीत तसा  ठासून भरलेला आहे. नाहीतर ज्यांच्या वडिलांची अख्खी हयात धर्मनिरपेक्ष विचारांच्या सावलीत गेली, ते संग्राम जगताप सध्या जे बोलत आहेत, ते बोललेच नसते . महिला आयोग हा महिलांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी आहे, कोणत्या मयत महिलेच्या चारित्र्य हननासाठी नाही इतकी राजकीय जाण महिला आयोगाच्या अध्यक्षांना असती तरी त्यांनी संपदा मुंडे मृत्यु प्रकरणात कोडगेपणा दाखविला नसता. त्याहून कहर म्हणजे संग्राम जगताप, रुपाली चाकणकर किंवा अगदी प्रकाश सोळंके यांनी कोणीही केलेल्या विधानाबद्दल पक्षाचे अध्यक्ष असलेले अजित पवार मात्र सहमत नसतात , मात्र तरीही या साऱ्यांना सोबत घेऊनच त्यांना चालायचे असते. अनेक विषयावर त्यांच्याच पक्षात त्यांचे फारसे काही चालत नाही असे जे चित्र समोर येत आहे तो देखील राजकीय आचरटपणाच. मागे लातूर जिल्ह्यात सुनील तटकरेंचा दौरा असताना शेतकऱ्यांच्या विषयावर बोलणाऱ्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या ज्या सुरज चव्हाणने मारहाण केली होती, त्याला अजित पवारांनी पदावरतून काढले मात्र लगेच सुनील तटकरेंनी पद दिले, हा राजकीय विनोद म्हणायचा की आचरटपणा का टगेगिरी? हे सारे केवळ अजित पवारांच्या राष्ट्र्वादीतच घडत आहे असे नाही, पण भाजपला या असल्या काही प्रकारचे सोयरसुतक असण्याचे दिवस केव्हाच गेले आहेत, शिंदेंच्या शिवसेनेला स्वतःची अशी कोणती भूमिका नाही, राहिला प्रश्न विरोधीपक्षांचा, तर तोडफोडीच्या राजकारणाने त्यांचा महाराष्ट्रात तरी अस्तित्वासाठीचा संघर्ष सुरु आहे, त्यामुळे त्यांची दखल फारशी घेण्याची आवश्यकता नाही. मात्र जे अजित पवार काकांपासून वेगळे झाल्यानंतर यशवंतरावांच्या सुसंकृत राजकारणाचे जणू तेच एकमेव वारसदार आहेत असे दाखवत असतात, आपल्या प्रत्येक भाषणात आपण विकासासाठी भाजपसोबत गेलो असलो तरी आपल्याला यशवंतरावांचा विचार पुढे न्यायचा आहे असे सांगत असतात , त्यांच्या पक्षात असला राजकीय आचरटपणा हा विचार नेमका कोणाचा आहे?

Advertisement

Advertisement