फलटण म्हणजे निंबाळकरांची अघोषित राजेशाही असलेली भूमी, इथे कारखानदारांच्या वसुलीसाठी पोलीस यंत्रणा स्वतः सक्रिय होते, भलत्याच लोकांवर कारखानदार अत्याचार करत असताना पोलीस कारखानदारांना साहाय्यभूत होतात, अगदी डॉक्टरांवर देखील जिथली व्यवस्था इतका दबाव टाकते की बीड जिल्ह्यातील एका महिला डॉक्टरला प्राणास मुकावे लागते, तरीही राज्याचे मुख्यमंत्री मात्र धावतपळत जाऊन निंबाळकरांना क्लिनचिट देण्यात धन्यता मानतात. हे तेच मुख्यमंत्री आहेत, ज्यांनी बीडमध्ये अराजक असल्याचे थेट विधानसभेच्या सभागृहात सांगितले होते. त्यानंतर राज्यातील सर्वाधिक गुन्हेगारी असणारा जिल्हा म्हणजे बीड असावा असे चित्र मागच्या वर्षभरात राज्यात निर्माण केले गेले. अगदी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बीडला अराजक म्हणून हिणविल्यानंतर बीडच्या नागरिकांना इतर कोणी हिणवले तर दाद मागायची कोणाकडे, पण तेच मुख्यमंत्री फलटणमधील पुढाऱ्यांना क्लिनचिट देण्यासाठी धावत असतील तर 'देवा भाऊ , हे वागणं बरं नव्ह' असे म्हणण्याची वेळ आली आहे.

फलटणमध्ये कार्यरत असलेल्या बीडच्या एका महिला डॉक्टरला आत्महत्या करावी लागली असे सध्या तरी समोर आणले गेले आहे. आणले गेले यासाठी म्हणायचे की मयत डॉक्टरच्या कुटुंबियांना ही आत्महत्या वाटत नाही तर घातपात वाटतो. सुरुवातीला पोलीस अधिकाऱ्याच्या छळामुळे सदर डॉक्टरने आत्महत्या केल्याचे समोर आले होते, त्याचवेळी 'प्रजापत्र'ने या मृत्यूला अनेक कंगोरे असल्याचे म्हटले होते. आता फलटणमध्ये सदर डॉक्टर महिलेला व्यवस्थेतून कशाप्रकारे दबावाला सामोरे जावे लागत होते हे समोर येत आहे. सदर डॉक्टरने यापूर्वी तिला येत असलेल्या अडचणी आणि तिच्यावर येत असलेला दबाव याबद्दल आपल्या वरिष्ठांना आणि पोलिसांना देखील कळविले, मात्र त्याची दखल वरिष्ठांनी घेतली नाही,यावरूनच सदरचा दबाव किती प्रभावशाली यंत्रणेतून आला असावा हे सहज लक्षात येऊ शकते. सदर डॉक्टरने आपल्या पत्रात खासदार आणि खासदाराच्या स्वीय सहाय्यकाचा उल्लेख केलेला आहे, हे लक्षात येताच, घटनेची पुरेशी चौकशी झालेली नसताना देखील खुद्द राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहममंत्री असलेले देवेंद्र फडणवीस उर्फ देवा भाऊ तातडीने फलटणमध्ये जाऊन रणजितसिंह निंबाळकरांना क्लिनचिट देतात हे जरा आक्रितच. एखाद्या घटनेत जिथे एखाद्या मुलीचा जीव गेला आहे, तिथे पूर्ण माहिती हाती येण्याअगोदर , तपास पूर्ण होण्या अगोदर राज्याचा मुख्यमंत्री संशयाच्या सावलीत असलेल्या एखाद्या व्यक्तीला क्लिनचिट देणार असेल तर त्या प्रकरणाचा तपास खरोखर निष्पक्ष कसा होईल आणि त्या मयत डॉक्टरला खरोखर न्याय कसा मिळेल? मान्य आहे, निंबाळकर देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे आहेत आणि सध्या कोणत्याही आरोपातून वाचण्याचा शेवटचा मुक्काम भाजप हाच आहे, पण म्हणून तपासाचे किमान काही सोपस्कार पूर्ण होण्याची वाट तरी फडणवीसांनी पाहायला हवी होती.
देवेंद्र फडणवीस फलटणमध्ये जाऊन ज्या निंबाळकरांची पाठराखण करत आहेत, त्या रणजितसिंह निंबाळकरांच्या कारखान्याच्या दादागिरीच्या अनेक घटना आता समोर येत आहेत. फडणवीसांचे पोलीस जणू स्वराज कारखान्याच्या 'रेशन कार्डवर' असल्यासारखे कसे वागतात, एखादी महिला डॉक्टर आपले ऐकत नाही याच्या तक्रारी पोलीस गृह खात्यातील वरिष्ठांना करीत नाहीत , तर माजी खासदारांना करतात, म्हणजे त्या भागात कायद्यापेक्षाही मोठे कोण आहेत हे वेगळे सांगण्याची आवश्यकता राहतच नाही. बीडमधल्या काही घटनेनंतर बीड जिल्ह्यात अराजकाची परिस्थिती असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी थेट विधानसभेत सांगितले. आता राज्याच्या प्रमुखानेच थेट सभागृहात हे जाहीर केल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात बीडच्या लोकांकडे कोणत्या नजरेने पाहिले जाईल याचा विचार करण्याची आवश्यकता त्यावेळी ना मुख्यमंत्र्यांना वाटली, ना माध्यमांना ना कोणत्याच समाज घटकाला , मात्र त्याचे परिणाम आता दिसत आहेत. 'तू बीडची असल्याने प्रमाणपत्र देत नाहीस का?' असे जर बीडच्या एखाद्या लेकीला विचारले जात असेल तर मग यापेक्षा मोठे अराजक कोणते असते? राज्यातील एखाद्या भागाची इतकी बदनामी करायची आणि दुरीकडे अलिखित हुकूमशाहीला मात्र तातडीने क्लिनचिट द्यायची हा प्रकार किमान देवभाऊ म्हणविणाऱ्या देवेंद्र फडणवीसांकडून तरी राज्याला अपेक्षित नव्हता, नाही. डॉ. संपदा हिच्या मृत्यूने महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेवर, कायद्याच्या राज्यावर आणि व्यवस्थेतील मुखंडांवर मोठे प्रश्नचिन्ह लावले आहे. देवेंद्र फडणवीस यात न्यायची बाजू घेणार का?

