Advertisement

बोलेरोमधून देशी-विदेशी दारूची तस्करी  

प्रजापत्र | Friday, 12/09/2025
बातमी शेअर करा

बीड- जिल्ह्यात देशी विदेशी दारूची वाहतूक अवैधपणे काही ठिकाणी सुरू असते.ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहाय्यक निरीक्षक बाळराजे दराडे यांनी पांगरबावडीच्या पुलाजवळ पाठलाग करून अश्याच एका गाडीतून देशी-विदेशी दारूचा मोठा साठा जप्त केला आहे. या कारवाईत ७ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.
    बोलेरो गाडी (एम.एच.२३ बीसी.२७८१) मधून देशी विदेशी दारूची तस्करी करण्यात येतं असल्याची माहिती सपोनि बाळराजे दराडे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांच्या टीमने सापळा रचला. मात्र गाडी पांगरबावडीच्या पुलाजवळ येताच पोलिसांना बघून चालकाने गाडी वेगात पळविली. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी गाडीचा पाठलाग करून सदर गाडीची झाडाझाडती घेतली असता गाडीत ६० हजारांची विदेशी दारू तर ७० हजारांची देशी दारू आढळून आली. त्यामुळे पोलिसांनी बोलेरो कारसह ७ लाख ६० हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.ग्रामीण पोलीस ठाण्यात आतिष मोराळे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार महादेव तुळशीराम मस्के (रा.बाहेगव्हाण, ता.वडवणी),सिद्धेश्वर उत्तमराव देशमाने (रा. पिंपरखेड, ता. वडवणी) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन पांडकर, पोलीस निरीक्षक मारुती खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि बाळराजे दराडे यांच्या टीमने केली आहे
.

Advertisement

Advertisement