Advertisement

उधारीच्या पैशावरून धारधार शस्त्राने हल्ला 

प्रजापत्र | Monday, 25/08/2025
बातमी शेअर करा

गेवराई दि.२५(प्रतिनिधी): किराणा दुकानातील उधारीवरून (Crime)दुकानदाराला धारधार शस्त्राने जीव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला असून तो गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

        दादासाहेब बबनराव तळतकर (रा. बंगाली पिंपळा, ता. गेवराई) हे सकाळी ८.३० च्या दरम्यान आपल्या किराणा दुकानात असताना सिद्धार्थ बंडु माने हा तेथे आला. त्याने पाण्याची बाटली मागितली असता फिर्यादी यांनी त्याला सांगितले की, “तुझ्या चुलत्याकडे माझी ९०० रुपयांची उधारी आहे, ती आधी चुकता कर.” या कारणावरून सिद्धार्थ माने संतापला. त्याने दादासाहेब तळतकर यांना शिवीगाळ करून दुकानाबाहेर खेचले व चापट मारली.इतक्यात त्याचा चुलता सुधीर भगवान माने हा हातात धारदार लोखंडी कत्ती घेऊन आला.दादासाहेब तळतकर यांच्या मानेवर व कानामागे कत्तीने वार करून गंभीर दुखापत केली. या वेळी तळतकर यांचा भाऊ गणेश याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही उजव्या हाताच्या बोटाला कत्तीचा वार बसला.यानंतर भगवान माने याने लाकडी काठीने तळतकरच्या पाठीवर मारहाण केली, तर मधुकर उर्फ बंडु माने हा लोखंडी कोयता घेऊन आला आणि शिवीगाळ करू लागला. गावातील काही नागरिकांनी मध्यस्थी करून दुकानदार तळतकर व त्याचा भाऊ यांना सोडवले. जखमींना तातडीने बीड येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.या प्रकरणी सिद्धार्थ बंडु माने, सुधीर भगवान माने, भगवान बापुराव माने आणि मधुकर उर्फ बंडु माने (सर्व रा. बंगाली पिंपळा) यांच्याविरुद्ध चकलांबा पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

 
 

Advertisement

Advertisement