बीड-पोलीस प्रशासन भर पावसात अज्ञात मृतदेहाची ओळख पटवित कागदोपत्री कारवाई करत होते मात्र आरोग्य विभागाला सदर मृतदेहाचे शवविच्छेदन करायला वेळ मिळत नसल्याचे चित्र नवगणराजुरीत पहायला मिळाले. आरोग्य विभागाच्या संवेदनाच गोठल्याने मृत्यूनंतरही मृतदेहाच्या वाटयाला अवहेलनाच आली. त्यामुळे संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. नवगण राजुरी येथे रविवारी दुपारी अज्ञात मृतदेह सापडला. ग्रामीण पोलीसांनी तातडीने कारवाई करत मृतदेहाची ओळख पटविली. भर पावसात धावाधाव केली. मात्र मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागातील कोणीच उपलब्ध नव्हते. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकाऱ्यांपासून जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांशी पोलीस संपर्कात असताना पाच तासानंतरही शवविच्छेदन होऊ शकले नाही. आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणाने मृतदेहाची मृत्यूनंतर देखील अवहेलना झाली याबद्दल सर्वत्र हळहळ आणि संताप व्यक्त होत आहे.

बातमी शेअर करा