संजय मालाणी
बीड दि. ७: लोकसभा निवडणूकीपासूनच सामाजिक दृष्टया गढूळ झालेले बीड जिल्ह्याचे वातावरण नंतरच्या विधानसभा निवडणुका आणि त्यानंतर झालेले संतोष देशमुख हत्याकांड यामुळे अधिकच गढुळले. मागच्या तिन महिन्यात राज्याच्या पातळीवर बीड जिल्ह्याचा चेहरा तर काळवंडली पण समाजातील दुही, अस्वस्थता आणि परस्परातील अविश्वास मोठया प्रमाणावर वाढला आहे. याबद्दल बोलायला मुख्य प्रवाहातले कोणी तयार नसताना कॉंग्रेसने पुढाकार घेत ही कोंडी फोडली आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष मस्साजोगहून आज सद्भावना यात्रा घेऊन निघत आहेत. ही यात्रा पक्षाच्या पलीकडली असेल असे देखील जाहीर करण्यात आलेले आहे. या यात्रेच्या निमित्ताने सद्भावनेचा सुरु झालेला प्रवाह अधिकाधिक विस्तारीत व्हावा, सद्भावना वाढीस लागावी आणि जिल्हयाचे चित्र बदलावे हीच अपेक्षा.
बीड जिल्हा मागच्या तीन महिन्यांपासून राज्याच्या पातळीवर चर्चेत आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीड बद्दल राज्यभर उलटसुलट चर्चा सुरु आहेत. बीड जिल्ह्यातील सामान्य नागरिकांना या चर्चेची झळ बसत आहे. जिल्ह्यातील लोकांना पुण्या मुंबईत लॉज मिळायला तयार नाही, बीडच्या विद्यार्थ्यांना इतर ठिकाणी रहायला खोल्या मिळत नाहीत, बीड जिल्ह्यात नातेसंबंध तयार करायला लोक तयार नाहीत इतकी बीडची बदनामी झाली आहे. हे झाले बाहेरचे, जिल्हयाच्या आतले चित्र तर अधिकच भीषण आणि वेदनादायी आहे. या जिल्ह्यातील सामाजिक सलोख्याची विण पुर्णतः उसवली असून त्याची जागा परस्पर अविश्वासाने घेतली आहे
तसेतर आरक्षण आंदोलन पुढे करत बीडमध्ये जी जाळपोळ झाली, खरेतर तेव्हाच सामाजिक सलोख्याला चुड लागायला सुरुवात झाली होती. त्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या राजकारणाने अधिकचे तेल ओतले. आणि सामाजिक अविश्वासाचा अग्नी अधिकच भडकला. इतका की कालपर्यंत एका ताटात जेवणारे मित्र देखील परस्परांकडे अविश्वासाने पहायला लागले आहेत. जातीच्या कुंपनांचे काच आणि ओरखडे परस्परांच्या नात्यांना जखमी आणि रक्तबंबाळ करु लागले आहेत. समाजात निर्माण झालेली ही दरी पुढच्या कितीतरी पिढ्यांसाठी घातक ठरणार आहे.
त्यातच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि नंतरच्या घडामोडींनी चित्र अधिकच बिकट झाले आहे. खरेतर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी हीच सामान्यांची जनभावना आहे. हत्येचे समोर आलेले फोटो पाहून संवेदना जिवंत असलेला प्रत्येकजण हळहळत आहे. मात्र या प्रकरणाला मरणारा मराठा आणि मारणारे वंजारी या चष्म्यातून दाखविण्याचा, पाहण्याचा प्रकार मागच्या काळात झाला हे चित्र बदलणे आवश्यक आहे. यासाठी मधल्या काळात काही प्रयत्न सुरु झाले. समाजवादी, पुरोगामी चळवळीतील लोकांनी एक पाऊल टाकले, आता कॉंग्रेसने यातील कोंडी फोडली आहे. आज मस्साजोगहून सद्भावना यात्रा निघत आहे. यात पुढाकार कॉंग्रेसचा असला तरी यात्रा समाजाची असणार आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हा राजकारणातला वेगळा चेहरा आहे. त्यांनी या यात्रेत पक्षाचे झेंडे, बॅनर असणार नाहीत असे म्हटले आहे. जिल्हाध्यक्ष राहुल सोनवणे आणि त्यांच्या टीमने ही यात्रा सर्वसमावेशक व्हावी यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे.
या यात्रेच्या माध्यमातून सामाजिक सद्भावासाठी पहिले पाऊल उचलले गेले आहे. कुपाटी काढली गेली आहे, आता सद्भावना यात्रेला सामाजिक सलोख्याच्या महामार्गाचे स्वरूप यावे, जिल्हयाचे चित्र बदलावे ही आपली सर्वांची, प्रत्येक संवेदनशील नागरिकाची जबाबदारी आहे.
'बघ येऊन ठेपली, तुझ्या घराशी आग,
झोपेची ना वेळ ही, भल्या माणसा जाग'
असे म्हणण्याची हे वेळ आहे. चला आपण सारेच सद्भावनेच्या रस्त्यावर आपल्या पुरते एक पाऊल टाकुयात. वाईट विचारांना, विकृतींना कायदेशीर मार्गाने गाडुयात आणि सामाजिक सलोख्यासाठी, तुमच्या आमच्या पुढच्या पिढ्यांच्या भवितव्यासाठी पुढाकार घेऊयात.

बातमी शेअर करा