धाराशिव - जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाला गुणवत्तापूर्ण,सुलभ आणि सर्वसमावेशक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध असून आरोग्य क्षेत्रातील आवश्यक सुविधा उभारण्यासाठी निधीची कोणतीही कमतरता पडू दिली जाणार नाही,अशी ग्वाही पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
आज ४ ऑगस्ट रोजी जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीच्या स्थापना व उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर,जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.धनंजय चाकूरकर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सतीश हरिदास,तसेच वैद्यकीय अधिकारी,विविध विभागांचे अधिकारी,आरोग्य कर्मचारी तसेच समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री श्री.प्रताप सरनाईक म्हणाले की,जिल्हास्तरीय एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची स्थापना हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेला अधिक सक्षम,समन्वयपूर्ण आणि लोकाभिमुख बनविण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वपूर्ण पाऊल आहे. शासनाच्या विविध आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी,विभागांमधील समन्वय आणि नागरिकांना वेळेत दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ही समिती महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून आयुष्मान आरोग्य मंदिर,प्राथमिक आरोग्य केंद्रे,ग्रामीण रुग्णालये,उपजिल्हा रुग्णालये,जिल्हा रुग्णालये,महिला रुग्णालये तसेच हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना यांसारख्या योजनांद्वारे आरोग्य सेवा नागरिकांपर्यंत पोहोचत असल्याचे सांगत त्यांनी या सर्व योजनांचा लाभ प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याची आवश्यकता अधोरेखित केली.
सरनाईक यांनी आरोग्य संस्थांमधील सेवा अधिक परिणामकारक करणे, नागरिकांच्या आरोग्यविषयक तक्रारींचे तातडीने निराकरण करणे,राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी, विविध विभागांतील समन्वय वाढविणे आणि लोकसहभागातून आरोग्य व्यवस्था अधिक बळकट करणे ही समितीची प्रमुख जबाबदारी असल्याचे स्पष्ट केले.
वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना योजना अधिक प्रभावी करण्यासाठी जिल्ह्यात दवाखान्यांची संख्या वाढविण्यावर भर दिला जाईल. तसेच रुग्णवाहिका आणि शववाहिका सेवा नागरिकांना वेळेत व कार्यक्षमतेने उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जातील.यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
प्रतिबंधात्मक आरोग्य,माता-बाल आरोग्य, पोषण,स्वच्छता,पाणीपुरवठा,संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांवरील नियंत्रण, जनजागृती आणि समुदाय सहभाग या क्षेत्रांना या समितीच्या माध्यमातून अधिक बळ मिळेल,असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी पालकमंत्री श्री.सरनाईक यांनी समितीतील सर्व सदस्य,अधिकारी आणि संबंधित विभागांनी समन्वय,पारदर्शकता आणि जबाबदारीच्या भावनेतून कार्य करून धाराशिव जिल्ह्याला आरोग्य सेवांच्या क्षेत्रात राज्यातील आदर्श जिल्हा बनविण्याचे आवाहन केले.तसेच समितीच्या स्थापनेसाठी योगदान देणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करून समितीच्या यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

