Advertisement

राज्यातील ११ धरणे शंभर टक्के भरली

प्रजापत्र | Friday, 31/07/2026
बातमी शेअर करा

पुणे: जुलैअखेर राज्यातील ३ हजार २९ धरणांमध्ये ६३.२५ टक्के पाणीसाठा असून, गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा ७० टक्के होता. त्या तुलनेत यंदा जलसाठ्यात सुमारे सात टक्क्यांची घट आहे. कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस झाल्याने धरणे भरत असून, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचे प्रमाण कमी असल्याने अनेक धरणांमध्ये अजूनही समाधानकारक पाणीसाठा नाही. कोकण विभागात सर्वाधिक ८३.७२ टक्के पाणीसाठा असून पुणे विभागात ७८.४४ टक्के पाणीसाठा आहे.

    राज्यातील ११ धरणे शंभर टक्के भरली असून त्यामध्ये दिना (गडचिरोली), भाम, ओझरखेड, वाघाड, तिसगाव (नाशिक), राधानगरी (कोल्हापूर), भाटघर व येडगाव (पुणे), उजनी (सोलापूर) तसेच मोडकसागर व तानसा (ठाणे) या धरणांचा समावेश आहे. तर २२ धरणांमध्ये अद्यापही एक थेंबही पाणी साठलेले नाही. यामध्ये सर्वाधिक धरणे बीड, धाराशिव, लातूर, नांदेड आणि हिंगोली या मराठवाड्यातील जिल्ह्यांतील आहेत. अनेक लघु व मध्यम प्रकल्प कोरडे असल्याने या भागात पुढील काळात पावसाने उशीर केल्यास पाणीटंचाईचे संकट अधिक गडद होण्याची भीती व्यक्त होत आहे. राज्यातील धरणांच्या स्थितीनुसार ५ ते ५० टक्के पाणीसाठा असलेली ५९ धरणे, तर ५१ ते ९९ टक्के पाणीसाठा असलेली ८२ धरणे आहेत. ऑगस्ट महिन्यात होणाऱ्या पावसावर राज्याच्या जलसुरक्षेचे मोठे गणित अवलंबून राहणार आहे.यंदा कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि काही प्रमाणात उत्तर महाराष्ट्राला पावसाने दिलासा दिला असला, तरी मराठवाड्यातील अनेक धरणे अजूनही कोरडी आहेत. त्यामुळे खरीप हंगाम, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा आणि रब्बी हंगामासाठी आवश्यक जलसाठा निर्माण करण्याचे मोठे आव्हान कायम आहे. ऑगस्ट महिन्यात दमदार पाऊस झाल्यासच या भागातील परिस्थितीत सुधारणा होण्याची शक्यता आहे.

 

विभागानिहाय पाणीसाठा (टक्के)
विभाग ---- सध्याचा --- मागील वर्षीचा

नागपूर ---- ५२.२८ -- ६०.०३
अमरावती ---- ४३.४२ -- ५६.४५

संभाजीनगर ---- ३६.१८ -- ५५.४४
नाशिक ---- ६६.८० -- ६५.८३

पुणे ---- ७८.४४ -- ८१.९२
कोकण ---- ८३.७२ -- ८४.०४

एकूण ---- ६३.२५ -- ७०.०४
 

Advertisement

Advertisement