धाराशिव: प्रत्येक गावात डिजिटल सायन्स लॅब, वाचनालय, अभ्यासिका, विद्युत शवदाहिनी, प्रत्येक घरावर सौरऊर्जा प्रकल्प, आशा व पर्यवेक्षिकांना स्कूटर, हजारो महिलांना उद्योगासाठी आर्थिक मदत आणि सायंकाळी ७ ते ९ या वेळेत टीव्ही व मोबाईल बंद ठेवण्यासारखे अभिनव उपक्रम राबविण्याचा संकल्प करणारी धाराशिव जिल्हा परिषद राज्यातील पहिली जिल्हा परिषद असल्याचे गौरवोद्गार ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांनी काढले. जिल्हा परिषदेच्या प्रस्तावित नवीन प्रशासकीय इमारतीसाठी शासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करण्याची, ग्वाहीही मंत्री गोरे यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या वतीने सोमवारी जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या प्रांगणात आयोजित 'आपला जीव धाराशिव व्हिजन २०३०' कार्यक्रमात ते बोलत होते. विकसित महाराष्ट्राचा संकल्प मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केला असून, त्याला पूरक ठरेल असे विकसित धाराशिवचे स्वप्न जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांनी मांडल्याचे सांगत गोरे यांनी अर्चनाताई पाटील यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. अशा प्रकारचे दूरदृष्टीचे नियोजन करणारी धाराशिव जिल्हा परिषद राज्यातील पहिली असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले. या व्हिजनमधील सर्व उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी ग्रामविकास विभाग जिल्हा परिषदेच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली. धाराशिवमधून सुरू झालेल्या या अभिनव अभियानाचे अनुकरण राज्यातील सर्व जिल्हा परिषदांनी करावे, यासाठी आपण प्रयत्नशील राहू, असेही त्यांनी यावेळी जाहीर केले.
तुळजाभवानी मातेच्या आशीर्वादाने छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली, याची आठवण करून देत धार्मिक व ऐतिहासिक वारसा लाभलेल्या धाराशिवमधून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विकासाचा नवा आदर्श निर्माण होत आहे. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकसित भारत आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दुष्काळमुक्त महाराष्ट्राचा संकल्प पुढे नेला जात आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील समुद्रात वाहून जाणारे अतिरिक्त पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळविण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेला आता मोठी गती मिळाली आहे. मुख्यमंत्री महोदयांच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेला हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आणि धाराशिव जिल्ह्याचा सिंचनाचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील घेत असलेल्या प्रयत्नांचे आपण प्रत्यक्ष साक्षीदार असल्याचेही मंत्री गोरे यांनी स्पष्ट केले. राज्यातील ४० हजार महसुली गावांपैकी सुमारे आठ हजार गावांमध्ये अद्याप स्मशानभूमी नसल्याची माहिती देत, अशा गावांमध्ये प्रथम स्मशानभूमी उभारण्यास प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी सांगितले. प्रत्येक गावात विद्युत शवदाहिनी उभारण्याचा धाराशिव जिल्हा परिषद अध्यक्षांचा निर्णय राज्यासाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी अनुकरणीय असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी
आमच्या भगिनींच्या कार्यकाळातच नवी इमारत : मंत्री गोरे
सन १९९० मध्ये बांधलेली धाराशिव जिल्हा परिषदेची विद्यमान इमारत आता अपुरी पडत आहे, नवीन इमारतीची मागणी जिल्हा परिषदेकडून आपल्याकडे करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष सौ. अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील आणि उपाध्यक्ष सौ. उषाताई रवींद्र गायकवाड या दोन्ही आमच्या भगिनी आहेत. त्यांची मागणी सकारात्मकरीत्या पूर्ण केली जाईल. विद्यमान अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांच्या कार्यकाळातच धाराशिवच्या 'मिनी मंत्रालया'च्या नव्या इमारतीचे स्वप्न साकार करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाहीही ग्रामविकास मंत्री जयकुमारजी गोरे यांनी यावेळी दिली.
धाराशिवमध्ये ११० गणांत विद्युत शवदाहिनी; ७ ते ९ 'टीव्ही-मोबाईल बंद' उपक्रमाला गती : अर्चनाताई पाटील
धाराशिव जिल्ह्यातील ११० पंचायत समिती गणांमध्ये जिल्हा परिषद वित्त आयोगाच्या निधीतून विद्युत शवदाहिनी उभारण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून, पर्यावरण संवर्धनाबरोबरच नागरिकांची आर्थिक बचत हा त्यामागील उद्देश असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली.
मुख्यमंत्री ग्रामसमृद्धी अभियानांतर्गत जिल्ह्यात प्लास्टिकचे कप व प्लास्टिक पिशव्यांवर पूर्णतः बंदी घालण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ₹१,००० दंड आकारला जाणार असून, आठवडा बाजारांमध्ये विशेष पथके यावर देखरेख ठेवतील. शहरी भागातील नगरपालिकांनीही या उपक्रमाची अंमलबजावणी करावी, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, जिल्ह्यातील सुमारे ७०० गावांमध्ये दररोज सायंकाळी ७ ते ९ या वेळेत 'टीव्ही आणि मोबाईल बंद' हा 'अभिमन्यू' उपक्रम प्रभावीपणे राबविण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक गावासाठी अधिकारी-कर्मचारी पालक म्हणून नियुक्त करण्यात आले असून, शिक्षक, ग्रामसेवक, लोकप्रतिनिधी आणि ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या सहभागातून या मोहिमेची अंमलबजावणी केली जात आहे.
याशिवाय, प्रत्येक घरावर तसेच शासकीय इमारतींवर सौरऊर्जा पॅनल बसविण्याचा संकल्प असून, 'शून्य वीजबिल' गावांची संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
विकासकामांना मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे मोठे पाठबळ : राणाजगजितसिंह पाटील
धाराशिव–तुळजापूर रेल्वेमार्गाचे सुमारे ₹३,००० कोटींचे काम जून २०२७ पर्यंत पूर्ण होऊन या मार्गावर रेल्वे धावण्यास सुरुवात होईल, तर तुळजापूर–सोलापूर टप्पा डिसेंबर २०२९ पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी यावेळी दिली. पूर्वीच्या महाविकास आघाडी सरकारकडून या प्रकल्पासाठी राज्याच्या वाट्याचा निधी न मिळाल्याने कामाला विलंब झाला. मात्र, महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील साडेतीन हजार कुटुंबांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यात येत असून, प्रत्येक बूथमागे पाच महिलांना उद्योगासाठी शासकीय अनुदान किंवा कर्जाच्या माध्यमातून सहाय्य केले जाणार आहे. आतापर्यंत २,७०० महिलांची नोंदणी पूर्ण झाली असून उर्वरित प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. धाराशिव जिल्हा परिषदेच्या नव्या प्रशासकीय इमारतीसाठी पीपीपी तत्त्वावर मान्यता देण्याची मागणी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे करण्यात आल्याचेही पाटील यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पाणी, रेल्वे, रोजगार आणि पर्यटन क्षेत्रातील आपल्या जिल्ह्यातील महत्त्वाचे प्रकल्प मोठ्या गतीने मार्गी लागत असून, त्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा मिळत असल्याचा विश्वासही आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

