Advertisement

आ.सोळंकेंना शेटेंची धास्ती का वेगळेच राजकारण ?    

प्रजापत्र | Sunday, 07/06/2026
बातमी शेअर करा

 बीड दि.६ (प्रतिनिधी): मागच्या काही दिवसात, विशेषतः एक दीड वर्षात माजलगाव मतदारसंघाचे भाजपचे नेते म्हणून ओमप्रकाश शेटे यांना प्रोजेक्ट केले जात आहे. त्यातच विधानपरिषदेच्या जागेसाठी देखील त्यांच्या नावाच्या चर्चा झाल्याचे समोर आले आणि त्यानंतर अचानक माजलगावचे राष्ट्रवादीचे आ. प्रकाश सोळंके यांना ओमप्रकश शेटेंचा 'प्रभाव' खुपत असल्याचे चित्र निर्माण होत आहे. आ. प्रकाश सोळंके हे माजलगाव मतदारसंघातील ज्येष्ठ राजकारणी आहेत, असे असताना त्यांनी ओमप्रकाश शेटे यांना अधिकच 'गांभीर्याने' घेत असल्याचे दाखविण्यामागे आ. सोळंकेंना खरोखर ओमप्रकाश शेटेंच्या प्रभावाची धास्ती आहे, का भविष्यात शेटेच विरोधात यावेत यासाठीचे हे राजकारण आहे ?
माजलगावच्या राजकारणात मागच्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे आ. प्रकाश सोळंके आणि आयुष्यमान भारत योजनेचे महाराष्ट्र प्रमुख तथा भाजपचे नेते ओमप्रकाश शेटे यांच्यातील कलगीतुरा चर्चेत आहे. ओमप्रकाश शेटे हे मुख्यमंत्र्यांशी जवळीक असल्याचे सांगत अधिकाऱ्यांवर 'प्रभाव' टाकतात असा आरोप आ. प्रकाश सोळंके यांनी केला होता, तर आ. सोळंकेंच्या निकटवर्तीयांनी आता ओमप्रकाश शेटे यांच्या आयुष्यमान भारत वरील निवडीच्या संदर्भाने संभ्रम निर्माण करणे सुरु केले आहे. त्यातून आ. प्रकाश सोळंके यांनी ओमप्रकश शेटे यांना जास्तच गांभीर्याने घेतले असल्याचा संदेश मतदारसंघात जात आहे.
ओमप्रकाश शेटे यांचे आरोग्याच्या क्षेत्रात काम फार मोठे आहे. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी आणि आता आयुष्मान भारत अभियान या दोन्हींच्या माध्यमातून त्यांनी राज्यभरात रुग्णांना उपचारासाठी मदत मिळवून दिलेली आहे. त्यांच्या स्वतःच्या बीड जिल्ह्यात देखील त्यांचा चाहता वर्ग फार मोठा आहे. ओमप्रकाश शेटे हे माजलगाव मतदारसंघातील आहेत, आणि शेटे यांच्या राजकीय महत्वकांक्षा देखील सर्वज्ञात आहेत. संसदीय पदांच्या माध्यमातून सध्याचे काम अधिक प्रभावीपणे करता येईल हे ते बोलून दाखवितात. मागच्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी देखील त्यांच्या नावाची चर्चा झाली होती. विधानसभेनंतर रमेश आडसकरांनी माजलगाव ऐवजी केजकडे अधिक लक्ष दिल्यानंतर माजलगाव मतदारसंघातील भाजपचे नेते म्हणून ओमप्रकाश शेटे यांचे नाव प्राधान्याने घेतले जात आहे. त्यातच विधानपरिषद निवडणुकीसाठी देखील त्यांच्या नावावर भाजपमध्ये चर्चा झाल्याने ओमप्रकाश शेटेंची राजकीय 'इयत्ता' निश्चितच वाढली आहे, आणि त्यातूनच आता आ.प्रकाश सोळंके यांनी ओमप्रकाश शेटेंना लक्ष करणे सुरु केले आहे. त्यामुळे आता आ. सोळंकेंना खरोखर शेटेंच्या 'प्रभावाची'धास्ती वाटते हा प्रश्न अनेकांना पडला आहे.
मात्र माजलगावचे राजकारण दिसते तेवढे सरळ कधीच नव्हते, त्यातही राजकारणात आ. प्रकाश सोळंकेंची चाल कधीच हत्तीची नसते तर ते उंटाची तिरकी चाल चालण्यात माहीर मानले जातात. त्यामुळे ओमप्रकाश शेटे हेच आपल्या विरोधात यावेत यासाठी तर ओमप्रकाश शेटेंचा 'प्रभाव' आपल्याकडूनही वाढेल असे प्रयत्न तर या कलगीतुऱ्यात नाहीत ना असा संशय घ्यायला जागा आहे. ओमप्रकाश शेटे हे भाजपचे नेते असले तरी मंत्री पंकजा मुंडे यांच्याशी त्यांचे फारसें सख्य नाही, मग अशावेळी आपल्याला विरोधात शेटेच परवडतील असा विचार करून शेटेंना विरोधी चेहरा करण्यासाठी तर आ. सोळंके सक्रिय झाले नसावेत ?
 

Advertisement

Advertisement