नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनावर अखेर सरकारकडून बोलणी सुरु असून कॉकरोच जनता पार्टीच्या प्रवक्त्यांनी केंद्रीयमंत्री जेपी नड्डा यांची भेट घेतली. तत्पूर्वी सोनम वांगचुक यांनी आपलं उपोषण मागे घेत सरकारने तीन मागण्या मान्य केल्याचं सांगितलं. मात्र, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत सरकारने अट मान्य केली नसल्याचं दिसून आलं. त्यानंतर, कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) प्रमुख अभिजीत दीपके यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून, जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असे म्हटले. त्यानंतर, आज दुपारी जेपी नड्डा यांच्यासमवेत सीजेपीच्या प्रवक्त्यांची बैठक झाली.
सीजेपी प्रवक्त्यांची जेपी नड्डांसोबत बैठक घेऊन आंदोलन आणि मागण्यांबाबत सविस्तर चर्चा केली. जे. पी नड्डा यांच्याकडे आम्ही आमच्या तीन मागण्या ठेवल्या आहेत. त्यामध्ये, पहिली मागणी म्हणजे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात यावा, त्यामध्ये कुठलीही तडतोड केली जाणार नाही. यासह मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना एक कोटींची आर्थिक मदत, तसेच २० जुलै रोजी संसद परिसरात झालेल्या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवरील दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्यावेत, या प्रमुख तीन मागण्या कॉकरोच जनता पार्टीने सरकारपुढे मांडल्या आहेत. त्यावेळी, सरकारने दोन मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे. मात्र, धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत निर्णय घेण्यासाठी उद्या दुपारपर्यंत वेळ मागितला असल्याचे कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरव दास यांनी म्हटले. जंतर मंतर आणि संसद परिसरात विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला. त्यामध्ये, अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून काहींना मुक्का मारही लागला आहे. त्यामुळे, ज्यांनी विद्यार्थ्यांना मारहाण केली, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. तसेच, या दुर्घटनेतील पीडित कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, अशीही मागणी सीजेपीने केली आहे. दरम्यान, सरकारसोबत सविस्तर चर्चा झाली असून सरकारने उत्तर देण्यासाठी उद्या दुपारी २ वाजेपर्यंतची वेळ मागितली आहे, असेही सौरव दास यांनी स्पष्ट केले.

