Advertisement

तलावात पोहताना डॉक्टरचा मृत्यु 

प्रजापत्र | Tuesday, 19/05/2026
बातमी शेअर करा

अंबाजोगाई दि.१९(प्रतिनिधी) येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे भूलशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ.अभिमन्यू तरकसे यांचा काळवीट साठवण तलावात पोहताना आज सकाळी ६:३० च्या सुमारास बुडून मृत्यु झाला.  
     डॉ.अभिमन्यू तरकसे हे प्रकृती सुदृढ ठेवण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून नित्यनेमाने अंबाजोगाई शहरालगत असलेल्या काष्टी (काळवीट) साठवण तलावात पोहण्यासाठी जात असत. आज सकाळीही ते नेहमीप्रमाणे एकटेच पोहण्यासाठी तलावात उतरले. पाण्यात उतरण्यापूर्वी त्यांनी सुरक्षिततेचा उपाय म्हणून आपल्या कमरेला बिसलरीची रिकामी बाटलीही बांधली होती. मात्र, काही वेळानंतर तलावातील सांडव्याच्या बाजूला एक मृतदेह तरंगताना पोहणाऱ्या काही लोकांच्या निदर्शनास आला. त्यांनी जवळ जाऊन खात्री केली असता, हा मृतदेह डॉ. तरकसे यांचाच असल्याचे स्पष्ट झाले. घटनेची माहिती मिळताच स्वराती वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टर मित्रांनी,प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात आणला. मृत्यूचे नेमके कारण काय? त्यांना पोहताना हृदयविकाराचा झटका आला की अन्य काही घडले, याचा खुलासा शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. एका अत्यंत मनमिळाऊ,तज्ज्ञ डॉक्टरांच्या अकाली जाण्याने अंबाजोगाई शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Advertisement

Advertisement