Advertisement

धाराशिव जिल्ह्याला मिळाल्या तीन अग्निशमन गाड्या

प्रजापत्र | Thursday, 19/11/2026
बातमी शेअर करा

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील अग्निशमन यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने तीन नवीन अग्निशमन गाड्या उपलब्ध झाल्या आहेत. यासाठी माजी आमदार ज्ञानराज चौघुले यांनी गेल्या दोन वर्षांपासून केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. या महत्त्वपूर्ण निर्णयासाठी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचे आभार मानले आहेत.

धाराशिव जिल्ह्यातील वाढते शहरीकरण, लोकसंख्येची वाढ आणि आगीच्या घटनांचा विचार करता अग्निशमन यंत्रणा सक्षम असणे आवश्यक होते. मात्र, उपलब्ध अग्निशमन सुविधांवर मर्यादा येत असल्याने नवीन अग्निशमन गाड्या उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात येत होती.

या पार्श्वभूमीवर माजी आमदार ज्ञानराज चौघुले यांनी १९ फेब्रुवारी २०२४ रोजी  परिवहनमंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे धाराशिव नगर परिषदेसाठी अग्निशमन गाडी खरेदी करण्याकरिता निधी उपलब्ध करून देण्याची मागणी पत्राद्वारे केली होती. जिल्हा वार्षिक नियोजनांतर्गत निधी उपलब्ध करून प्रशासकीय मान्यता देण्याबाबत त्यांनी या पत्रात आग्रह धरला होता. या पत्रावर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जिल्हाधिकारी, धाराशिव यांना प्रस्ताव तपासून सादर करण्याचे निर्देश दिले होते.

त्यानंतरही चौघुले यांनी शासनस्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून धाराशिव जिल्ह्यासाठी तीन अग्निशमन गाड्या उपलब्ध झाल्या आहेत. या गाड्यांमुळे जिल्ह्यातील अग्निशमन सेवेची क्षमता वाढणार असून आग दुर्घटना तसेच अन्य आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदतकार्य करणे शक्य होणार आहे.

या कामासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी सकारात्मक भूमिका घेत सहकार्य केल्याबद्दल माजी आमदार ज्ञानराज चौघुले यांनी त्यांचे विशेष आभार व्यक्त केले आहेत. त्यांच्या दोन वर्षांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जिल्ह्याच्या अग्निशमन सुविधांमध्ये महत्त्वाची भर पडली आहे.

Advertisement

Advertisement