नागपूर : अलिबागमध्ये वाहतूक कोंडीत अडकल्यामुळे २० महिन्यांच्या बालकाचा रुग्णवाहिकेतच तडफडून मृत्यु झाल्याच्या घटनेनंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी नागपूर येथे 'हॉस्पिटल ऑन व्हील्स' ही नवी योजना जाहीर केली असून,पहिल्या टप्प्यात ३०० अत्याधुनिक रुग्णवाहिका सेवेत दाखल होणार आहेत.
जुन्या १०८ रुग्णवाहिका सेवेचे आता नव्या निविदा प्रक्रियेद्वारे आधुनिकीकरण केले जात आहे.येत्या २ तारखेपासून या नव्या रुग्णवाहिका रस्त्यावर धावतील.या नव्या संकल्पनेनुसार,रुग्णाला रुग्णवाहिकेत घेताच आयसीयूच्या धर्तीवर त्वरित वैद्यकीय उपचार आणि डॉक्टरांची सुविधा उपलब्ध असेल.अलिबागसारखी घटना पुन्हा घडू नये आणि आपत्कालीन स्थितीत प्रवासादरम्यानच रुग्णांचे प्राण वाचावेत,या उद्देशाने राज्य सरकारने ही यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलल्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

