किल्लेधारुर दि.९(प्रतिनिधी): हैदराबादहून संभाजीनगरकडे कपटे घेऊन जाणाऱ्या टँकरचा धारूर घाटात रविवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. ब्रेक निकामी झाल्याने धोकादायक वळणावर नियंत्रण सुटून टँकर सुमारे ३०० फूट खोल दरीत कोसळला. अपघातानंतर टँकरला आग लागली. मात्र चालकाने प्रसंगावधान राखत उडी मारल्याने त्याचा थोडक्यात जीव वाचला.
अधिक माहितीनुसार, एमएच १४ जे ४६०० क्रमांकाचा टँकर हैदराबादहून संभाजीनगरकडे माल घेऊन जात होता. धारूर घाटातील धोकादायक वळणावर पोहोचताच टँकरचे ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे टँकर थेट दरीत कोसळताच आग लागून मोठ्या प्रमाणात ज्वाळा उसळल्या. दरम्यान, चालक महादेव बिक्कड यांनी वेळेत उडी मारल्यामुळे मोठा अनर्थ टळला.अपघातानंतर त्यांना किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर केज येथे उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या पथकाने अथक प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत टँकरमधून धुराचे लोट निघत असल्याचे दिसून येत होते.
धारूर घाटात धोकादायक वळणांमुळे अपघातांची मालिका सुरूच आहे. मागील वर्षभरात या ठिकाणी ट्रक,टँकर दरीत कोसळण्याची ही पाचवी-सहावी घटना असल्याचे सांगितले जाते. वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे हा घाट मृत्यूचा सापळा ठरत असल्याची भावना वाहनचालकांमध्ये व्यक्त होत आहे. या घाटाचे रुंदीकरण व सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याची मागणी नागरिक व वाहनचालकांकडून वारंवार केली जात आहे. मात्र अद्याप ठोस उपाययोजना झालेल्या नसल्याने भविष्यात आणखी अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

