आष्टी दि.२० ( प्रतिनिधी) : इंग्लिश बनावट पिस्तूल घेऊन चारचाकी वाहनाने ब्रम्हगांव हाजीपूर रस्त्याने येत असल्याची गोपनीय माहिती आष्टी पोलिसांना मिळताच सापळा रचून चारचाकीसह दोघांना ताब्यात घेतले असून दोन पिस्तूल जप्त करण्यात आल्याची कारवाई गुरूवारी रात्री ९ च्या दरम्यान केली.
आष्टी पोलिस ठाणे हद्दीतील ब्रम्हगांव हाजीपूर रस्त्यावरून एका चारचाकी वाहनातून काही व्यक्तीजवळ पिस्तूल असल्याची गोपनीय माहिती मिळताच ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांनी कर्मचाऱ्यांना ही माहिती देताच या रस्त्यावर सापळा लावून गुरूवारी रात्री ९ च्या दरम्यान राहूल खोटे रा.मूगगाव,अमृत भोसले रा.पारगांव घुमरा ता.पाटोदा जि.बीड या दोघेजणांना ताब्यात घेऊन दोन इंग्लिश बनावटीचे पिस्तुल जप्त करत अटक करण्यात आली आहे.यात इतर आरोपीचा देखील समावेश असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

