आष्टी दि.१७ (प्रतिनिधी): सोशल मीडियावर एकमेकांच्या विरोधात स्टेटस आणि स्टोरी टाकण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर भीषण हाणामारीत झाले आहे. तालुक्यातील रुईनालकोल येथे सोमवारी रात्री तरुणांच्या दोन गटात धारदार शस्त्राने एकमेकांवर वार करण्यात आले. या हल्ल्यात एका २० वर्षीय तरुणाचा मृत्यु झाला असून अन्य दोन मित्र गंभीर जखमी झाले आहेत.
आष्टी तालुक्यातील रुईनालकोल येथील जिल्हा परिषद शाळेसमोर सोमवारी रात्री तरुणांचे दोन गट आमनेसामने आले. इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅपवर एकमेकांच्या विरोधात टाकलेल्या 'स्टोरी'वरून त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून कुरापत काढली जात होती. याच वादाचे पर्यावसान सोमवारी रात्री हाणामारीत झाले. एका गटातील तरुणांनी रागाच्या भरात धारदार शस्त्राने दुसऱ्या गटातील तिघांवर सपासप वार केले.या भीषण हल्ल्यात दीपक शिवाजी नालकोल (वय २०), रा. रुईनालकोल हा तरुण गंभीर जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी दवाखान्यात नेत असतानाच वाटेतच त्याचा मृत्यू झाला. तर, त्याच्यासोबत असलेले अन्य दोन तरुणही या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दोघांचीही प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
पोलीस प्रशासनाची धाव
घटनेची माहिती मिळताच आष्टीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय नरवाडे, विक्रांत हिंगे, पोलीस उपनिरीक्षक कृष्णा नरवाडे आणि त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. गावात सध्या तणावाचे वातावरण असून पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे. याप्रकरणी पुढील तपास आष्टी पोलीस करत असून आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

