बीड दि.१६(प्रतिनिधी): परळी रेल्वे स्थानकातून दोन दिवसांपूर्वी ताब्यात घेण्यात आलेल्या एका महिलेला बीड जिल्हा रुग्णालयातील वार्ड क्रमांक ६ मधील संकटग्रस्त महिला निवारण सखी केंद्रात ठेवण्यात आले होते. आज शुक्रवारी सकाळी सदर महिलेने बाथरूममध्ये तोडफोड करत साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली.
यामुळे जिल्हा रुग्णालयात गोंधळ उडाला होता. हा प्रकार लक्षात येताच घटनास्थळी उपस्थित सखी केंद्रातील कर्मचारी आणि पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून महिलेचा जीव वाचवला. त्यानंतर संबंधित महिलेला बीड शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. या प्रकरणाचा तपास डीवायएसपी पूजा पवार या करत असून संबंधित महिलेने आत्महत्येचा प्रयत्न का केला, याबाबत सखोल चौकशी सुरू आहे. चौकशीनंतर या घटनेमागील कारणे स्पष्ट होईल अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली. या घटनेमुळे जिल्हा रुग्णालय परिसरात एकच खळबळ उडाली असून सखी केंद्रातील सुरक्षिततेबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

