बीड- प्रत्येक अधिकारी, कर्मचारी परस्पर ऑनलाईन यंत्रणेत रजेचा अर्ज टाकून रजेवर निघून जातात या दुखण्यावर इलाज करण्यासाठी आता बीडच्या पोलीस अधीक्षकांनी रजा हवी असेल तर रजेच्या अर्जासोबत मागच्या आठवडाभरात काय काम केले याचा अहवाल जोडून देणे आवश्यक असल्याचे आणि त्याचे मूल्यमापन करूनच रजा मंजुरीचा निर्णय होणार असल्याचे आदेश काढले आहेत. यामुळे पोलीस दलात खळबळ माजली असून रोगापेक्षा इलाज भयंकर ठरणार असल्याच्या चर्चा होत आहेत.
बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी बीड जिल्हा पोलिस दलाची प्रतिमा बदलण्याचा विडा उचलला आहे. त्यासाठी ते नवेनवे प्रयोग करीत आहेत.त्यांच्या अनेक निर्णयांचे स्वागत देखील झाले. एकीकडे पोलीस दलाला शिस्त लावतानाच त्यांना अडचणी येणार नाहीत यासाठी देखील घटक प्रमुख त्यांनी पाऊले उचलली आहेत.आता मात्र कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या रजेच्या संदर्भाने त्यांच्या एका आदेशाने खळबळ निर्माण झाली आहे.
पोलीस खात्यातील अनेकजण व्हाट्सअप वर रजा टाकून रजा मंजुरीची वाट न पाहताही रजेवर जात असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे मनासारखे होत नसेल तर किंवा एखादी कोणालातरी 'दुखावणारी' कारवाई टाळायची असेल तरी देखील तात्पुरती रजा टाकून ते घोंगडे इतरांच्या गळ्यात टाकले जाते.या रोगावर इलाज करण्यासाठी आता पोलीस अधीक्षक सरसावले आहेत. त्यासाठी त्यांनी रजेच्या अर्जासोबत मागच्या आठवड्यातील कामाचा गोषवारा सक्तीचा केला आहे. त्या गोषवाऱ्याचे मूल्यमापन करूनच कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या रजेचा निर्णय होणार असल्याचे पोलीस अधीक्षकांनी म्हटले आहे. यामुळे रजेच्या बाबतीतल्या मनमानीला निश्चितपणे चाप बसणार असला तरी 'मूल्यमापन' अनेकांसाठी मोठा अडथळा ठरणार आहे. काही अपवाद सोडले तर बहुतांश व्यक्ती रजा ही तातडीच्या कामासाठी,अडचणीच्यावेळी घेत असतात, त्या प्रत्येकवेळी मूल्यमापनाची सक्ती केली गेली तर यातून अधिकारी कर्मचाऱ्यांच्या अडचणी वाढणार आहेत. प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कामाचे वार्षिक मूल्यमापन होतच असते, तसे सीआर त्यांच्या सेवा पुस्तिकेला जोडले जात असतातच, मग ही वार्षिक व्यवस्था असताना रजेचे घोडे मूल्यमापनाच्या वेशीत अडविण्याचा प्रकार रोगापेक्षा इलाज जालीम ठरू नये असे कर्मचारी दबक्या आवाजात बोलत आहेत.
नियंत्रण आणि कार्यपद्धती सुधारण्यासाठी निर्णय
मागच्या काळात अनेक अधिकारी , कर्मचारी परस्पर रजेचा हक्क उपभोगत असल्याचे निदर्शनास आलेले आहे. अनेकदा अधिकारी, कर्मचारी यांच्यात समन्वय नसल्याचे आणि कोणाचे कोणावर नियंत्रण नसल्यासारखे चित्र देखील माझ्यासमोर आले. त्यामुळे मला हा निर्णय घ्यावा लागला . कोणाला रजा नाकारणे ही या मागची भावना नाही, मात्र प्रत्येकाला त्याची जबाबदारी आणि काम याची जाणीव निर्माण व्हावी हा यामागचा हेतू आहे.
नवनीत कॉवत
पोलीस अधीक्षक , बीड