बीड-शिरूर कासार तालुक्यातील आनंदवाडीमधील एका महिलेचा अनैतिक संबंधला अडसर ठरू लागल्याने पतीनेच डोक्यात दगड घालून पत्नीचा खून केल्याची घटना सोमवारी पहाटे ४ च्या सुमारास घडली होती. अखेर याप्रकरणात चकलांबा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीच्या अटकेसाठी पोलिसांची दोन पथके शोध घेत असताना संबंधित इसामाने स्वतःच्या शेतातच जाळून घेत आत्महत्या केल्याची माहिती समोर येतं आहे. दरम्यान या घटनेमुळे जिल्ह्यात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
शिरूर कासार तालुक्यातील आनंदवाडीमधील भिवसाबाई विष्णू कदम (वय-५७) या महिलेचा राहत्या घरात डोक्यात दगड घालून खून केल्याचा प्रकार पहाटे घडला होता. सोमवारी रात्री आरोपी पतीविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांची दोन पथके आरोपीच्या अटकेसाठी मागावर होती. मात्र मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास आनंदवाडीमधील विष्णू कदम याच्या शेतात आग लागल्याचा प्रकार समोर आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असता एका इसमाचा मृतदेह जळून कोळसा झाल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदर मृतदेह हा विष्णूचा असल्याचा अंदाज वर्तविण्यात येतं असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. दरम्यान पत्नीला रागाच्या भरात संपविल्यानंतर पतीने देखील टोकाचे पाऊल उचलले असल्याचे परिसरात चर्चीले जात आहे. या दुहेरी घटनेमुळे आनंदवाडीमध्ये खळबळ उडाली आहे.

