Advertisement

केळीला कवडीमोल भाव

प्रजापत्र | Monday, 05/10/2026
बातमी शेअर करा

आष्टी : निसर्गाचा लहरीपणा, खतांचा आणि मजुरीचा वाढलेला खर्च, आणि त्यातच बाजारात केळीला मिळणारा नीचांकी दर, या दुष्टचक्रात सापडलेल्या बळीराजाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. परतूर तालुक्यातील संकनपुरी येथील विक्रम तौर या शेतकऱ्याने केळीला भाव नसल्याने हतबल होऊन आपल्या शेतातील तब्बल साडेसात हजार केळीची उभी झाडे जेसीबीच्या साहाय्याने मुळासकट उपटून टाकली आहेत. या टोकाच्या निर्णयामुळे त्यांची रात्रंदिवसाची मेहनत आणि तब्बल सहा लाख रुपयांची गुंतवणूक मातीत मिसळली आहे.

 

उत्पादन खर्चही निघेना

विक्रम तौर यांनी मोठ्या आशेने आणि जिद्दीने केळीची बाग फुलवली होती. मात्र, वाढत्या उन्हाचा आणि निसर्गाच्या लहरीपणाचा फटका पिकाला बसला. यातच भर म्हणून बाजारात केळीचे दर अक्षरशः कोसळले. पीक विकून त्यातून लागवडीचा खर्चही निघणार नाही, अशी स्थिती निर्माण झाल्याने तौर यांच्यासमोर उभे पीक नष्ट करण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग उरला नाही.

 

मदतीची केवळ आश्वासने, प्रत्यक्ष रक्कम खात्यात कधी?

लाखो रुपये खर्च करून उभी केलेली बाग स्वतःच्या डोळ्यांसमोर उद्ध्वस्त करताना तौर यांची मोठी भावनिक कोंडी झाली. दरम्यान, राज्य शासनाने दुष्काळ जाहीर केला असला तरी, शेतकऱ्यांच्या हाती अद्याप काहीच पडलेले नाही. केवळ कागदोपत्री पंचनामे आणि नेत्यांच्या आश्वासनांवर पोट भरणार नाही; तर शासनाने तत्काळ थेट बँक खात्यात आर्थिक मदत जमा करावी, अशी संतप्त मागणी आता शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे.

 

Advertisement

Advertisement