Advertisement

माजलगाव पोलिसांचा धडाका; वाळू माफिया, मटका चालक आणि 'ड्राय डे'ला दारू विकणाऱ्यांवर धाडी

प्रजापत्र | Saturday, 03/10/2026
बातमी शेअर करा
  • वाळू माफियांवर कारवाई: टाकरवण येथे गोदावरी नदी पात्रात बेकायदा वाळू उपसा करणारा ४,८६,००० रुपयांचा ट्रॅक्टर जप्त.
  • जुगार अड्ड्यावर छापा: किट्टी आडगाव येथे मटका जुगारावर धाड टाकून ३८,२४० रुपयांचा मुद्देमाल व रोख रक्कम हस्तगत.
  •  'ड्राय डे'ला मद्यविक्रेत्यांना दणका: गांधी जयंतीच्या दिवशी अवैध दारू विक्री करणाऱ्या वडवणीत चार जणांवर आणि माजलगाव शहरात एकावर धडक कारवाई.
  • सलग तीन दिवस मोहीम: ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर सलग तीन दिवस उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक अनंत्रे यांच्या पथकाकडून अवैध धंद्यांवर सर्जिकल स्ट्राईक.

 

बीड : माजलगाव उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या विशेष पथकाने वाळू माफिया, मटका जुगार आणि गांधी जयंतीच्या 'ड्राय डे' दिवशी अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरुद्ध धडक मोहीम राबवत विविध ठिकाणी छापे मारले आहेत. या कारवायांमध्ये बेकायदा वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर, मटक्याचे साहित्य आणि मोठ्या प्रमाणावर अवैध दारू असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, संबंधित आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

पोलिसांनी ३० सप्टेंबर २०२६ रोजी माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टाकरवण येथे गोदावरी नदीतून बेकायदा वाळू उपसा करून नेणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई केली. यावेळी रोहन अंगद शिंदे (रा. तपेनिमगाव, ता. गेवराई) यास एका ब्रास वाळू आणि ट्रॅक्टर ट्रॉलीसह पकडण्यात आले असून, त्याच्याकडून ४,८६,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच दिवशी किट्टी आडगाव येथे वेशीबाहेर एका पत्र्याच्या शेडमध्ये 'मिलन डे' मटका जुगार चालवणाऱ्या युवराज दशरथ आगे आणि राधाकिसन गंगाराम रासवे (दोघे रा. किट्टी आडगाव) या दोघांवर छापा मारण्यात आला. त्यांच्याकडून रोख रक्कम व दोन मोबाईल असा एकूण ३८,२४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून त्यांच्यावर जुगार कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे.

 

१ ऑक्टोबर रोजी दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोणगाव येथील 'हॉटेल शेतकरी राजा'वर छापा टाकून राधेशाम नागोराव कोळसे याला १३,२९० रुपयांच्या देशी-विदेशी दारूसह रंगेहात पकडण्यात आले. विशेष म्हणजे, २ ऑक्टोबर रोजी गांधी जयंतीनिमित्त संपूर्ण जिल्ह्यात 'ड्राय डे' (मद्यविक्री बंद) घोषित केलेला असतानाही काही ढाबे व हॉटेल चालक वाढीव किमतीने विनापरवाना दारू विकत होते. याची दखल घेत पोलिसांनी दोन पथके तयार केली आणि वडवणी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चार ठिकाणी धाडी टाकल्या. यात राजाराम मुन्ना राठोड (रा. बावी तांडा), योगेश रमेश सावंत (रा. कुप्पा), अशोक मारोती शिंगाडे (रा. डिगोळ देशमुख) आणि गणेश दिलीप थोरात (रा. वडवणी) या चौघांना ७,६४५ रुपयांच्या अवैध दारूसह पकडून त्यांच्यावर चार स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. तसेच, माजलगाव शहर हद्दीत गढी रोडवरील 'हॉटेल साई धाबा' येथे छापा मारून नितीन मधुकर सरवदे याला ३,५६० रुपयांच्या दारूसह पकडण्यात आले.

 

सदर धडक कारवाया पोलीस अधीक्षक नवनीत काँवत, अपर पोलीस अधीक्षक चेतना तिडके यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक अनंत्रे यांच्या आदेशाने पार पडल्या. या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक माकणे, हवालदार मोरे, अंमलदार मंदे, कानतोडे, मुळे आणि चालक कांबळे यांच्या पथकाने सक्रिय सहभाग घेतला. पोलिसांच्या या सलग कारवाईमुळे सर्वसामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
 

Advertisement

Advertisement