पुण्यात विद्यानंद बापट या तरुणाने डीजेच्या गोंगाटाविरुद्ध आपला छोटा का होईना आवाज उठवला आणि त्या भूमिकेला आता सर्वत्र पाठिंबा मिळताना दिसत आहे. हा आवाज अर्थातच डीजेच्या गोंगाटाइतका मोठा असणार नाही, कर्णकर्कश देखील असणार नाही, मात्र डीजेच्या गोंगाटाला वैतागलेल्या सामान्यांना सण, उत्सव आणि समारंभांमधून डीजे बंद होणार असेल तर ते हवेच आहे. नागपूर, सोलापूर आदी जिल्ह्यात प्रशासनाने डीजे बंदीचे आदेश काढले आहेतच, आता राज्य पातळीवरच या संदर्भाने भूमिका घेण्याची आवश्यकता आहे.
सण ,उत्सव आणि डीजे याचा तसा धार्मिक संबंध असण्याचे काहीच कारण नाही, मात्र मागच्या काही वर्षात हा संबंध अधिक जोरकसपणे मांडला गेला आहे. डीजेशिवाय जणू काही कोणताच उत्सव होणारच नाही अशी परिस्थिती आणि चित्र राज्यभरात आहे.राज्याच्या उच्च न्यायालयाने, देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने ध्वनी प्रदूषणाच्या संदर्भाने कितीही आदेश दिले,तरी या गोंगाटालाच उत्सव समजणाऱ्या उतावळ्या कार्यकर्त्यांच्या समाधानासाठी किंवा असल्या उतावळ्यांना जपण्यासाठी राज्य सरकार कधीच कठोर भूमिका घेताना दिसत नाही.गणेशोत्सवाच्या दरम्यान मोठमोठ्याने वाजणारे डीजे सामान्यांना जगणे नकोसे करत असले तरी याविरोधात राज्यव्यापी भूमिका घेतली जात नाही.काही अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यकक्षेच्या मर्यादेत असे डीजे बंद करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर दबाव आणला जातो.डीजे म्हणजेच उत्सव मानणारी किंवा असे मानायला तरुणाईला उद्युक्त करणारी जी डीजेवाल्यांची लॉबी आहे, ती किती बळकट आणि प्रभावशाली आहे ते सध्या पुण्यात पाहायला मिळत आहे.एका विद्यानंद बापटने या डीजेच्या गोंगाटाच्या विरोधात आवाज उठविल्यानंतर त्या बापटला मारहाण करण्यापासून ते या संपूर्ण प्रकरणाला धार्मिक स्वरूप देण्यापर्यंत ज्या पद्धतीने अनेक शक्ती सक्रिय झाल्या आहेत,त्यावरून या डीजेची धटिंगणशाही लक्षात येऊ शकते.
एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने व्हावा अशी अपेक्षा करतात, सारेच उत्सव पर्यावरण पूरक असले पाहिजेत असे अपेक्षिले जाते, मात्र त्याचवेळी या डीजेच्या धटिंगणशाहीला आळा घालण्यासाठी तितकीशी ठोस भूमिका घेतली जात नाही.अधिकाऱ्यांना सबुरीचा सल्ला दिला जातो हाच आजपर्यंतचा अनुभव आहे.या डीजेमुळे सामान्यांना कितीही त्रास झाला तरी मूठभर कार्यकर्ते सांभाळायचे ही जी भूमिका पुढाऱ्यांच्या पातळीवर घेतली जाते, त्याचा परिणाम म्हणून हा गोंगाट दरवर्षी वाढत आहे. यासाठी मग अनेक ठिकाणी २-४ बेस सारखी पळवाट काढली जाते,मात्र त्यातूनही आवाजाच्या मर्यादेचे उल्लंघन होतेच.मुळात आवाजाचे डेसिबल मोजायचे कोठून? १ मीटरवरून का १५ मीटरवरून ? साधारणतः १५ मीटरचा तोडगा काढून यात डीजे वाल्यांना कसा फायदा होईल हे पाहिले जाते.मुळात कोणताही आवाज बंदिस्त वातावरणात आहे का कोठे यावरून त्याच्या परिणामांची तीव्रता निश्चित होत असते मात्र याचा विचार देखील करण्याची मानसिकता कोणाची नाही.डीजे आणि डीजेवाले,त्या डीजेलाच सर्वस्व मानणारी मूठभर तरुणाई हेच उत्सवाचे प्रमुख अंग मानण्याची मानसिकता वाढणार असेल तर याला रोखायचे कसे ?नागपुरात, सोलापूर या ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी डीजे बंदीचे आदेश काढले आहेत. आवाजाची मर्यादा वाढली म्हणून दहीहंडी उत्सवाच्या दिवशी पुण्यात काही गुन्हे दाखल झाले, मात्र मुळातच एक दोन जिल्ह्यात असे आदेश काढून भागणार नाही तर राज्य सरकारनेच यावर राज्यभरात 'नाही म्हणजे नाही ' अशी भूमिका घ्यावी लागेल.

