Advertisement

मनोज जरागेंच्या आंदोलनाविरोधात अंतरवालीत ओबीसींचे प्रतिआंदोलन

प्रजापत्र | Sunday, 06/09/2026
बातमी शेअर करा

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे यांचे अंतरवाली सराटी येथे सुरू असलेल्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर आता अंतरवाली सराटीतच ओबीसी समाजाकडून प्रतिआंदोलनाला सुरुवात झाली आहे. अंतरवालीतील सोनिया नगर येथे अॅड. मंगेश ससाणे प्रा.विठ्ठल तळेकर , सतीश कुलाल, बाबासाहेब बटुळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रविवारी उपोषण सुरू केले. जरांगे यांच्या आंदोलनातून सरकारवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप करत ओबीसींचे हक्क व संविधानिक आरक्षण टिकवण्यासाठी हे आंदोलन असल्याचे ससाणे यांनी सांगितले.

    यावेळी अॅड. मंगेश ससाणे म्हणाले, ‘‘उपोषणाच्या माध्यमातून सरकारवर दबाव टाकला जात आहे. मराठा समाजाला आतापर्यंत २२ लाख दाखले देण्यात आले आहेत. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि प्रसाद लाड हे पायघड्या टाकत आहेत. आम्ही आमचे हक्क आणि अधिकार टिकवण्यासाठी संविधानिक मार्गाने आंदोलन करत आहोत.’’नोडल अधिकारी नेमण्याच्या निर्णयावरही ससाणे यांनी आक्षेप घेतला. नोडल ऑफिसर नेमणे हे बेकायदेशीर असल्याचा आरोप त्यांनी केला. ‘‘सरकारवर दबाव टाकला जात आहे. ओबीसींची मंत्रिमंडळ समिती येथे येते का, हे आम्ही पाहणार आहोत,’’ असेही त्यांनी सांगितले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही ससाणे यांनी टीका केली. ‘‘देवेंद्र फडणवीस एका समाजाला स्पेशल ट्रीटमेंट देत आहेत. एका आडमुठ्या माणसामुळे महाराष्ट्र वेठीस धरला जात आहे,’’ असा आरोप त्यांनी केला.‘‘मागेल त्याला कुणबी दाखला देणार,’’ असे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटल्याचा दाखला देत ससाणे यांनी ओबीसी आरक्षणात घुसखोरी करण्यासाठी काही मंत्री षड्यंत्र रचत असल्याचा आरोप केला. मात्र, ओबीसी समाज आपल्या मागण्या आणि भूमिका संविधानिक मार्गाने मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

Advertisement

Advertisement