भामरागड : तालुक्यात पर्लकोटा नदीला आलेल्या पुराने थैमान घातले आहे. संततधार पावसामुळे ३० जुलै रोजी तालुका मुख्यालयातील तब्बल ८० टक्के वस्ती जलमय झाली असून अंदाजे ३०० घरे पाण्याखाली गेली आहेत. यामुळे संसारोपयोगी साहित्यासह अन्नधान्य पाण्यात वाहून गेले असून, व्यापारी वर्ग व सर्वसामान्यांचे संसार उघड्यावर आले आहेत.
२९ जुलै रोजी जिल्ह्यात हवामान विभागातर्फे पावसाचा 'रेड अलर्ट' जारी केला होता. दिवसभर व रात्रभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पर्लकोटा नदीच्या पाणीपातळीत वाढ होत होती. ३० रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास पुलाला पाणी लागल्याने नेहमीच्या अंदाजानुसार नागरिक गाफील राहिले. मात्र, मध्यरात्री १२:०० वाजता अचानक नदीच्या पातळीत विक्रमी वाढ झाली व बघता-बघता संपूर्ण बाजारपेठ व वस्तीत पाण्याचा लोंढा शिरला. पर्लकोटा नदीवरील जुन्या पुलावरुन पाणी वाहिल्याने रहदारी ठप्प असून तालुका मुख्यालयाचा जिल्ह्याशी संपर्क तुटलेला आहे.
मेडपल्लीसह अनेक गावे बाधित
भामरागड मुख्यालयासोबतच मेडपल्ली गावातही पुराचे पाणी शिरले असून, थोडराज, दुब्बगुडा, कोठी, फुलणार आणि गुंडरवाही गावांच्या परिसरातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. तहसीलदारांसह एन.डी.आर.एफ. पथक, अतिजलद प्रतिसाद पथक आणि पोलिस अधिकारी-कर्मचारी तैनात आहेत.

