पुणे : विद्यार्थी वाहतूक अधिक सुरक्षित व्हावी, याकरिता राज्याच्या परिवहन विभागाने शालेय बस आणि विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी नवीन नियमावली तयार केली आहे. या वाहनांमध्ये अग्निशामक यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांबरोबरच विद्यार्थ्यांच्या डिजिटल उपस्थितीची नोंद, त्याची पालकांना सूचना देणारी प्रणाली; तसेच किमान ३० दिवसांचे सीसीटीव्ही चित्रीकरण जतन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.या नियमावलीची तातडीने अंमलबजवणी करण्याचा आदेश प्रादेशिक परिवहन कार्यालयांना देण्यात आला आहे.
नव्या नियमांनुसार, शालेय बस आणि विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये व्हेइकल लोकेशन ट्रॅकिंग डिव्हाइस विथ पॅनिक बटन, फायर डिटेक्शन अँड अलार्म सिस्टीम, सीसीटीव्ही कॅमेरे, डिजिटल सेफ्टी मॉनिटरिंग सिस्टीम, वाहनांचे लाइव्ह लोकेशन दर्शविणारी मोबाइल ॲप सुविधा, विद्यार्थ्यांच्या डिजिटल उपस्थितीची नोंद, त्याची पालकांना सूचना देणारी प्रणाली आणि किमान ३० दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज जतन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय, विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये सर्व आसनांना सीटबेल्ट बसविणे अनिवार्य आहे.दरम्यान, शालेय बसच्या परवान्यासाठी वाहनाचे नोंदणी दिनांकापासूनचे आयुष्यमान १५ वरून २० वर्षांपर्यंत वाढवण्यात आले आहे. तर, शालेय बसचे शुल्क ठरविण्याचे अधिकार प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाला देण्यात आले आहेत.

