Advertisement

सीजेपीकडून उद्या देशव्यापी आंदोलनाची घोषणा

प्रजापत्र | Thursday, 23/07/2026
बातमी शेअर करा

नवी दिल्ली : नीट पेपरफुटी आणि देशातील शिक्षणाचा दर्जा सुधारला जावा यासाठी कॉकरोच जनता पार्टीकडून राजधानी नवी दिल्लीत जंतर मंतरवर आंदोलन करण्यात येत आहे. कॉकरोच जनता पार्टी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर ठाम आहे. सीजेपीच्या २० जुलैच्या मोर्चावर पोलिसांकडून लाठीमार करण्यात आला होता. त्या विरोधात कॉकरोच जनता पार्टीनं शुक्रवार (दि.२४) जुलै रोजी देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. हे आंदोलन शांततापूर्ण मार्गानं करण्यात यावं, असं आवाहन करण्यात आलं आहे. 

  सीजेपीनं उद्या देशभरात होणारं आंदोलन प्रत्येक जिल्ह्यात व्हावं, संपूर्ण देशभरात एकाच वेळी आंदोलन करण्यात यावं, असं आवाहन केलं आहे. देशभरातील विविध विद्यार्थी संघटना, सामाजिक संघटनांनी या सगळ्यात सहभागी व्हावं, असं आवाहन सीजेपीनं केलं आहे. या आंदोलनासाठी आवश्यक असणाऱ्या परवानग्या घ्याव्यात, असंही सांगण्यात आलं आहे. सर्व जण एकत्र आल्यानंतर सर्व संघटनांनी सीजेपीकडून करण्यात आलेल्या चार मागण्या सर्वांना वाचून दाखवाव्यात असं सांगण्यात आलं आहे. आंदोलनस्थळी इन्कलाब जिंदाबाद आणि भारत माता की जय अशा घोषणा द्याव्यात, असं सीजेपीकडून सांगण्यात आलं आहे. सीजेपीनं चार प्रमुख मागण्या केल्या होत्या, त्यामध्ये धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जावा, आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना सरकारनं एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई दिली जावी. विद्यार्थी आंदोलकांवर गुन्हे दाखल करु नये. दिल्लीत विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणाऱ्या पोलिसांवर कारवाई व्हावी, अशी मागणी सीजेपी केलेली आहे. 

लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या सर्व खासदारांची त्यांच्या निवास्थानी बैठक बोलावली आहे. काँग्रेसनं देखील विद्यार्थ्यांच्या प्रश्नी मोठ्या प्रमाणावर आंदोलन केलं आहे. छात्रों की गुंज या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थ्यांचे प्रश्न काँग्रेसकडून मांडण्यात आला. काँग्रेसकडून छात्रों की गुंज याचा पुढील कार्यक्रम मुंबईत आयोजित केला जाणार आहे. दुसरीकडे विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्याकडून २६ जुलैला संयुक्त मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. याशिवाय ठाकरेंची शिवसेना आणि मनसेकडून संयुक्तपणे उद्या सायंकाळी ५ वाजता राष्ट्रगीत गायन केलं जाणार आहे.  दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पेपरफुटीच्या प्रकरणांची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टांमध्ये केली जाईल, असं म्हटलं.  यावर राहुल गांधी, सीजेपीचे अभिजीत दिपके यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. दुसरीकडे सलग चौथ्या दिवशी संसदेत लोकसभा आणि राज्यसभेत कामकाज होऊ शकलं नाही.

Advertisement

Advertisement