मुंबई, (प्रतिनिधी): राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्य सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत लाभार्थीची प्राथमिक यादी उद्या (दि.२२ जुलै) रोजी जाहीर करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. तसेच, ३० जुलैपूर्वी पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा केली जाईल, अशी स्पष्ट ग्वाहीही त्यांनी दिली.
माध्यमांशी बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले की, कर्जमाफीला विलंब होण्यामागे काही तांत्रिक आणि प्रशासकीय कारणे होती. सुरुवातीला ३० जूनपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्याचे उद्दिष्ट होते. मात्र, पावसाळी अधिवेशनातील पुरवणी मागण्यांना राज्यपालांची मंजुरी मिळणे आवश्यक होते. त्यानंतर आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांची अंतिम माहिती केंद्र सरकारकडून मिळणेही गरजेचे होते. आता हा डेटा सरकारकडे प्राप्त झाला असून प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. कृषिमंत्र्यांनी सांगितले की, २२ जुलै रोजी अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक लाभार्थी यादी जाहीर करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात रक्कम वर्ग केली जाईल. भरणे म्हणाले की, आयकर भरणाऱ्या मोठ्या शेतकऱ्यांची माहिती उपलब्ध नसल्यामुळे यादी अंतिम करण्यात अडचणी येत होत्या. एखाद्या अपात्र शेतकऱ्याला लाभ देऊन नंतर तो थांबवण्यापेक्षा सुरुवातीपासूनच पात्र लाभार्थीची अचूक यादी तयार करण्यावर सरकारने भर दिला. आता केंद्र सरकारकडून आवश्यक माहिती मिळाल्यामुळे कर्जमाफीच्या अंमलबजावणीतील सर्व प्रमुख अडथळे दूर झाले आहेत. राज्य सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध असल्याचे सांगत कृषीमंत्र्यांनी स्पष्ट केले की, ३० जुलैपूर्वी पात्र शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा केली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही त्यांनी केले.

