गेवराई दि.४(प्रतिनिधी): शहरातील २० वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवार (दि.३)रोजी रात्री उघडकीस आली आहे. या प्रकरणी मृत विवाहितेच्या माहेरच्यांनी पती, सासू-सासरे, दीर, जाऊ आणि नणंद यांच्यावर हुंड्यासाठी आणि पैशांच्या मागणीमुळे मानसिक व शारीरिक छळ केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली आहे. पूजा प्रमोद सुरवसे असे आत्महत्या के लेल्या विवाहितेचे नाव आहे.
पूजाने गेवराई शहरातील गजानन नगर परिसरात राहत्या घरी साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेच्या दिवशी तिच्या कुटुंबीयांशी संपर्क झाला होता. त्यानंतर सायंकाळी तिच्या वडिलांना फोन करून मुलीने आत्महत्या केल्याची माहिती दिली. घटनेनंतर कुटुंबीयांनी तातडीने गेवराई येथील शासकीय रुग्णालय गाठले असता तेथे पूजाचा मृतदेह आढळून आला. मृत महिलेच्या भावाने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीनुसार, लग्नानंतर पती प्रमोद साईनाथ सुरवसे, सासरे साईनाथ बापुराव सुरवसे, सासू उषाबाई उर्फ जिजी साईनाथ सुरवसे, दीर गणेश साईनाथ सुरवसे, जाऊ आरती गणेश सुरवसे आणि नणंद अर्चना तुळसे यांनी व्यवसायासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत सतत मानसिक व शारीरिक छळ केला. या त्रासाला कंटाळून पूजाने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप करण्यात आला आहे. मूळची परभणी येथील रहिवासी असलेल्या पूजाचे वर्षभरापूर्वीच प्रमोद सुरवसे याच्याशी लग्न झाले होते. सुरुवातीचे काही दिवस सर्व काही आनंदाने सुरू होते. परंतु सासरच्या मंडळींकडून वारंवार त्रास दिला जात असल्याचं पूजाने आपल्या कुटुंबीयांना सांगितले होते. दरम्यान, या प्रकरणी गेवराई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. तपासानंतर संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती गेवराई पोलिसांनी दिली.

बातमी शेअर करा
