Advertisement

परीक्षा हॉलमध्ये घुसून विद्यार्थिनीला तरुणाची मारहाण

प्रजापत्र | Friday, 13/03/2026
बातमी शेअर करा

आष्टी दि.१३ (प्रतिनिधी): दहावीच्या परीक्षेसाठी आलेल्या एका विद्यार्थिनीला एका तरुणाने थेट परीक्षा हॉलमध्ये घुसून मारहाण केल्याची संतापजनक घटना शुक्रवारी सकाळी पावणे अकराच्या सुमारास घडली. आष्टी तालुक्यातील डोईठाण येथील परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला असून, या घटनेमुळे केंद्र परिसरात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

    मिळालेली माहिती अशी की, डोईठाण येथील केंद्रावर बीडसांगवी येथील शाळेतील मुली परीक्षेसाठी आल्या होत्या. सकाळी १०:४५ च्या सुमारास सर्व विद्यार्थी आपापल्या जागी बसलेले असताना, देसूर येथील एका तरुणाने अचानक हॉलमध्ये प्रवेश केला. त्याने तिथे बसलेल्या एका विद्यार्थिनीला काही कळायच्या आत मारहाण करण्यास सुरुवात केली. मारहाण केल्यानंतर आरोपी तरुणाने तातडीने तिथून पळ काढला.या अनपेक्षित हल्ल्यामुळे विद्यार्थिनी प्रचंड भयभीत झाली आणि तिला रडू कोसळले. तिने घडलेला सर्व प्रकार केंद्र संचालक आणि शिक्षकांना सांगितला. शाळा प्रशासनाने तातडीने मुलीच्या पालकांना बोलावून घेऊन घटनेची माहिती दिली. परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्त असतानाही एक तरुण थेट हॉलपर्यंत पोहोचलाच कसा, असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला आहे. याप्रकरणी पोलीस प्रशासनाकडून काय कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

Advertisement