छत्रपती संभाजीनगर – महाराष्ट्रातील १५ ते २४ वयोगटातील ६० टक्क्यांवर बाल-युवापिढी दिवसभरातील ३ ते ४ तास ऑनलाईन गेम्स खेळण्यात रममाण झालेली दिसत असून, त्यातील ४९ टक्के पिढी ही शहरी भागातील असल्याचे निरीक्षण मानसोपचार तज्ज्ञ, मनोविकार तज्ज्ञांचे आहे. ऑनलाईन गेम्सच्या विळख्यात अडकलेल्या मुलांचे समुपदेशन करण्यासाठी २०२५ या सालामध्ये ६० हजारांपेक्षा अधिक पालकांनी मनोसोपचार, मनोविकार तज्ज्ञांकडे धाव घेतल्याची माहिती सायकाॅलाॅजिस्ट वेल्फेअर ऑफ असोसिएशनकडून मिळाली आहे.
गाझियाबादमध्ये तीन लहान बहिणींनी ऑनलाईन गेम्सच्या प्रभावातूनच आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी घडल्यानंतर अवघा देश सुन्न झाला. या घटनेचे वेगवेगळे पदर समोर येत आहेत.महाराष्ट्रातील युवापिढीचेही ऑनलाईन गेमिंग्जमध्ये असणे हे चिंताजनक असल्याचे चित्र आहे. विशेषतः १५ ते २४ वयोगटातील मुलेही याच ऑनलाईन गेम्समध्ये अडकलेली असून, यामध्ये मुलींच्या तुलनेत मुलांची संख्या अधिक आहे. गेम आधारित मानसिक दबावामुळे आत्महत्येच्या प्रकरणांबद्दलही चिंता वाढलेली आहे. गेमिंग विकार हा मनोवैज्ञानिक विकार मानण्यात आल्याचे मानसोपचार तज्ज्ञ डाॅ. संदीप शिसोदे यांनी सांगितले.
पुण्यामध्ये अलिकडेच १४ वर्षाच्या मुलाची साडे तीन लाखांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. ऑनलाईन गेमिंगमुळे मुलांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष, युवावर्गाची आर्थिक फसवणूक, मोबाईल फोन खेळण्यासाठी न मिळाल्यास टोकाचे पाऊल उचलण्यापर्यंतच्या घटनाही अलिकडे समोर येत आहेत. बीडजवळ डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात एका दाम्पत्याचे मोबाईल फोनवरून भांडण झाले, नंतर विवाहितेने मुलीला मारहाण केली. यात मुलगी दगावल्यानंतर विवाहितेने स्वतः आत्महत्या केली.
नोकरी, व्यवसायातील व्यापामुळे पालकांशी मुलांचा संवाद तुटत असल्याचेही एक निरीक्षणही मानसोपचार तज्ज्ञांकडून नोंदवण्यात आलेले आहे. मुले धाडसी खेळामध्ये अधिक वेळ घालवत असून, अशा खेळामध्ये जास्तीत जास्त खेळाडू सहभागी असतील तर त्यात अधिक रस घेतात. अशा प्रकारच्या खेळाकडे १५ ते २२ वयोगटातील मुले आकर्षित होत असून, यामधून मानसिक तणाव, नैराश्य, चिंता, सामाजिक संवादाची कमतरता, स्व-प्रतिमा स्वाभिमान कमी, आत्महत्या करण्याचे विचार, डोळ्यांवर परिणाम, झाेप, वजन कमी-जास्त, शरीरातील लवचिकता कमी होणे, अशा तक्रारी घेऊन येणाऱ्यांचे प्रमाण आहे. गेमिंगच्या विळख्यातील केवळ १० टक्केच मुलांना त्यांचे पालक समुपदेशनासाठी मानसोपचार तज्ज्ञांकडे घेऊन येतात, असेही डाॅ. शिसोदे यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील विविध मानसोपचार, मनोविकार तज्ज्ञांकडे मागील वर्षभरात ६० हजारांपेक्षा अधिक मुलांना समुपदेशनासाठी आणण्यात आलेले आहे. ही संख्या केवळ १० टक्केच असून, त्यापेक्षा अधिक मुले ही ऑनलाईन गेमिंग्जच्या विळख्यात अडकली असण्याचा अंदाज आहे. मुलांची दिनचर्चा निश्चित करून खेळ, अभ्यास, बाहेरचे फिरणे यांचे संतुलन साधणे आवश्यक आहे. पालकांनी स्क्रीन टाईमचा नियम बनवून त्याचे पालन करावे. खेळ, कला, छंदासाठी प्रोत्साहन द्यावे व व्यसनाची लक्षणे दिसताच विशेषज्ञांकडे न्यावे. मुलांसाठी सरकारनेही मानसोपचारांची मदत घ्यावी. – डाॅ. संदीप शिसोदे , अध्यक्ष, सायकाॅलाॅजिस्ट वेल्फेअर असोसिएशन.

