Advertisement

संपादकीय अग्रलेख - निर्णय राष्ट्रवादीचा, वेदना इतरांनाच

प्रजापत्र | Saturday, 07/02/2026
बातमी शेअर करा

 अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर चौथ्या  दिवशी सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री म्हणून घेतलेली शपथ अजूनही राजकारणातील काहींना पचविता येत नसल्याचे चित्र आहे. विशेषतः मित्र पक्ष म्हणून सत्तेत सोबत असतानाही ज्यांनी कायम अजित पवारांना टिकेचेच धनी ठरविले होते, अशा शिंदे सेनेच्या नेत्यांनाच याच्या जास्त वेदना होत असल्याचे चित्र आहे. मुळात व्यक्तिगत दुःख आणि संघटनात्मक निर्णय यातील संतुलन 'पवारांना' चांगले समजते, मात्र त्या संतुलनामुळे इतरांचे संतुलन का ढासळत आहे हा प्रश्न आहेच.
 
  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने साऱ्या राज्याचेच नुकसान झाले आणि संपूर्ण राज्य आजही अजित पवारांसाठी हळहळते आहेच. जिथे साऱ्या राज्याला शोक होतोय तिथे पवार कुटुंबाच्या दुःखाची परिस्थिती काय असेल हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. मात्र राजकारणात काम करताना अनेकदा परिस्थितीची गरज म्हणून काही निर्णय घ्यावे लागतात, तास निर्णय सुनेत्रा पवारांनी घेतला. राष्ट्रवादीने ठरविले आणि सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. खरेतर हे सारे होत असताना आपण काय करत आहोत याची संपूर्ण जाणीव सुनेत्रा पवारांना असणारच, त्या काही राजकारण, समाजकारणात नवख्या नाहीत किंवा परिणामांची जाणीव नसणाऱ्या देखील नाहीत. अजित पवारांचे राजकारण त्यांनी जवळून अनुभवले आहेच. त्यामुळे या शपथविधीवरून त्यांना लक्ष करणे तसे अप्रस्तूतच. बरे एकवेळ किमान समाज असलेल्या नेटकऱ्यांनी फावल्या वेळात म्हणून स्वतःच्या समाज माध्यमांच्या भिंती सुनेत्रा पवारांवरील टीका आणि पटेल, तटकरे, भुजबळ, मुंडे यांच्यावर खापर फोडण्यासाठी रंगवल्या तर त्यात काही फारसे दखल घेण्यासारखे नाही, मात्र शपथविधी झाल्यानंतर अजूनही ज्या पद्धतीने महायुतीमधले काही नेते, विशेषतः शिंदे सेनेचे रामदास कदमांपासून ते अगदी संजय सिरसाटांपर्यंतचे अनेक जण यावर टीका करत आहेत, किंवा उपरोधाने बोलत आहेत, ते मात्र अजित पवारांच्या जाण्याच्या दुःखापेक्षा या लोकांना शपथविधीचा राजकारण करण्यात जास्त रस असावा हेच दाखविणारे आहे. उदय सामंतांसारखा मंत्री देखील त्याला अपवाद ठरू नये, या राजकारणाला काय म्हणणार?
शपथविधीवरून सुनेत्रा पवारांना सल्ला देणारे किंवा त्यांच्यावर टीका करणारे शिंदे सेनेचे नेते, या शपथविधीला त्यांचे नेते असलेले एकनाथ शिंदे देखील उपस्थित होते हे मात्र सोयीस्करपणे विसरत आहेत. मुळात पवार कुटुंबात दुखवटाच  तीन दिवसांचा असतो, याचीही माहिती न घेता, किंवा माहिती असली तरी त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करून आपलेच म्हणणे रेटण्याचा जो प्रकार शिंदे सेनेच्या नेत्यांकडून होत आहे, त्याला सुनेत्रा पवार आणि त्यांची राष्ट्रवादी आपल्याला राजकारणात अडचणीची ठरणार हेच खरे दुखणे आहे. रामदास कदम काय किंवा उदय सामंत काय, त्यांना  सुनील तटकरेंचे नाही म्हटले तरी तगडे आव्हान आहेच,त्यामुळे आता शपथविधीच्या माध्यमातून तटकरेंना खलनायक ठरवायचे,बाकी भुजबळ आणि मुंडेंना खलनायक ठरविण्यात धन्यता मानणारे नेते शिंदे सेनेत देखील कमी नाहीत, त्या सर्वांना आता सुनेत्रा पवारांच्या शपथविधीचा राजकारण करायचे आहे. जर एखाद्या नेत्याच्या जाण्याचे खरेच दुःख असेल, तर त्याच्या वारसांना शक्य तितकी मदत करण्यात संवेदनशीलता आणि सहवेदना असते, त्या ऐवजी निरर्थक चर्चा आणि टीका होत असतील तर यामागचे राजकारण महाराष्ट्र समजू शकतो. तरी बरे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भाने सर्वांनाच एकप्रकारची 'समज' दिली आहेच. पवारांच्या शपथविधीचा जे काही सामाजिक परिणाम  म्हणा किंवा किंमत म्हणा चुकवावी लागेल ती चुकविण्याची तयारी सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादीची असणारच.आपल्या कृतिचे अर्थ आणि परिणाम त्यांना माहित नाहीत असे नाही, मात्र यातून शिंदे सेनेतील अनेकांना ज्या वेदना होत आहेत, त्याचे कारण मात्र वेगळेच आहे.

Advertisement

Advertisement