Advertisement

संपादकीय अग्रलेख- हतबल व्यवस्था

प्रजापत्र | Thursday, 05/02/2026
बातमी शेअर करा

एकीकडे मोठमोठे महामार्ग आणि नवे नवे रस्ते बांधले जात असताना आणि त्या माध्यमातून दळणवळण सुरळीत झाल्याचे सांगितले जात असतानाच एखादा अपघात देखील महामार्गांची सारी व्यवस्था कशी कोलमडून टाकू शकतो याची अनेक उदाहरणे यापूर्वी पाहायला मिळाली होतीच,आता मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघाताने पुन्हा एकदा एकूणच व्यवस्थेची हतबलता समोर आणली आहे.
 
   मागच्या १० वर्षात केंद्रातील सरकारचे सर्वात मोठे काम कोणते दिसले असेल तर ते रस्ते बांधणीच्या कामांचे. मागच्या १०-१२ वर्षात देशात राष्ट्रीय महामार्ग आणि राज्य महामार्गांची मोठ्याप्रमाणावर कामे झाली. त्याची आवश्यकता देखील होतीच, नाही असे नाही. या महामार्गांच्या कामांमुळे संपर्काचे जाळे अधिक गटात विणले गेले, प्रवास सोपा झाला आणि असे बरेच काही सांगता येईल. त्यामुळे महामार्गांची कामे झाल्याबद्दल सरकारचे अभिनंदनच. मात्र ही कामे होत असताना, महामार्गांवरील अपघात किंवा अडथळ्यांच्या संदर्भाने आपत्कालीन व्यवस्था काय याचे कोणतेही नियोजन होताना दिसत नाही हे आपले विदारक वास्तव आहे. रस्ते सुरक्षा समितीच्या नावाने ज्या काही समित्या असतात त्या केवळ हेल्मेटसक्ती आणि तत्सम विषयांवरच आपले अस्तित्व जाणवून देत असतात. मात्र अगदी राष्ट्रीय महामार्गावर देखील होणारी वाहतुकीची कोंडी आणि त्यासाठीचे नियोजन याचा आपल्याकडे पूर्ण अभाव आहे.
मध्यंतरी प्रजासत्ताक दिनाच्या आसपास मोठ्या प्रमाणावर लोक पर्यटनसाठी म्हणून बाहेर पडले आणि महाराष्ट्रातील अनेक रस्त्यांवर प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळाली.अनेकांनी समाज माध्यमांच्या माध्यमातून त्या कोंडीची चालती बोलती कहाणी मांडली होतीच. यापूर्वी देखील गौरी गणपतीचा काळ असेल किंवा सण उत्सव,सलग सुट्ट्या,असले कोणतेही कारण आपल्या रस्त्यांवरच्या वाहतूक कोंडीला पुरेसे असते.आता महाराष्ट्रातील सर्वात महत्वाचा आणि गर्दीचा म्हणून ओळख असलेल्या मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाच्या वाहतूक कोंडीने महाराष्ट्राला हैराण केले आहे. या महामार्गावर तब्बल २२ तासांपेक्षा अधिक वाहतूक कोंडी झाली. एका गॅसच्या टॅंकरचा अपघात झाल्याचे निमित्त आणि या महामार्गावरील साऱ्या वाहतूक व्यवस्थेचेच पार मातेरे झाले. या महामार्गावर वाहने अडकल्याने राज्याच्या अनेक भागातून मुंबईकडे जाणाऱ्या एसट्या थांबवाव्या लागल्या. मागच्या अनेक वर्षात इतकी वाईट अवस्था होण्याची ही कदाचित पहिलीच वेळ, मात्र आपल्याकडे राष्ट्रीय महामार्गांवरील अपघात आणि वाहतुकीचे नियोजन किती तोकडे आहे हे दाखवायला ही गोष्ट पुरेशी आहे. मुळात महामार्गांचे जाळे विणले जात असताना वाहतुकीच्या आराखड्याचा काही विचार केला जातो का? वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून महामार्गांवर विशिष्ट अंतरावरून आपत्कालीन वाहतूक वळविण्याचे काही नियोजन असते का? या साऱ्या गोष्टींचा विचार करण्याची गरज या वाहतूक कोंडीने निर्माण केली आहे. रस्ते सुरक्षा समित्या असतील किंवा राष्ट्रीय महामार्ग विभाग,या विभागणी या बाबींवर देखील ठोस असे काही केले पाहिजे, आतापर्यंत तसे काही होताना दिसले नाही. महामार्ग पोलीस देखील महामार्गांवरील वाहतूक कोंडीच्या संदर्भाने फार काही करतांना दिसत नाहीत. एखाद्या टोलनाक्यावर थांबून एन्ट्री किंवा दंड जमा करणे यासाठीच महामार्ग पोलिसांचा विभाग तयार झालेला आहे का असे वाटावे इतकी महामार्ग पोलिसांची टोलनाक्याशी सलगी असते. ज्यावेळी अशा काही वाहतूक कोंडी किंवा अपघाताच्या घटना घडतात, त्यावेळी देखील हा विभाग फारसा मदतीला आलेले अनुभव दुर्दैवाने नाहीत. त्यामुळे अशा सर्व विभागांचा समन्वय, आपत्कालीन नियोजन आराखडा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत राष्ट्रीय महामार्ग असेल किंवा आणखी कोणते रस्ते, वाहतूक कोंडीच्या बाबतीत व्यवस्था अशीच हतबल होत राहणार आणि सामान्यांना केवळ चरफडत बसण्यापलीकडे कोणताच पर्याय राहणार नाही.

Advertisement

Advertisement