बीड दि. २२ (प्रतिनिधी): बीड जिल्ह्याच्या इतिहासात एकाच वेळी ६०० पेक्षा अधिक पोलीस कर्मचाऱ्यांच्या पारदर्शक बदल्या करून पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी एक वेगळा आदर्श निर्माण केला असतानाच जिल्हाधिकारी कार्यालयात मात्र काहींनी बदली प्रक्रिया म्हणजे 'महसूल' जमविण्याचे साधन समजून सावळा गोंधळ घालणे सुरु केले आहे. एक पदावधीची यादी जाहीर न करताच संबंधितांना फोन करून विनंती अर्ज मागविणे, दोन पदावधी यादीमध्ये बदलीपात्र नसलेल्या व्यक्तींचा समावेश करणे आणि एकाच तालुक्यात अनेक वर्ष ठाण मांडून बसलेल्या व्यक्तींना मात्र 'तांत्रिक' बाबींचा आधार घेत बदली प्रक्रियेतून वगळणे असे एक ना अनेक प्रकार सध्या आस्थापना शाखेत सुरु आहेत. यातील किती बाबींची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना आहे हे सांगता येणे अवघड आहे, मात्र साहेबांना आम्ही 'कन्व्हिन्स' करू असा विश्वास देत सध्या महसूल वर्तुळात वेगळेच खेळ सुरु आहेत.
बीड जिल्ह्यात सध्या बदल्यांचे वारे सुरु आहेत. जिल्हापरिषदेतील बदल्यांचा एक मोठा टप्पा झाला असून त्याबद्दल अनेक चर्चा सुरु असतानाच बीडच्या पोलीस अधीक्षकांनी मात्र जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावरील बदल्या पारदर्शीपणे करून इच्छाशक्ती असल्यास काय करता येते हे दाखवून दिले आहे. महसूल वर्तुळात मात्र बदल्यांच्या बाबतीत वेगळेच सुरु आहे. इतर बहुतेक जिल्ह्यांमध्ये बदली प्रक्रिया राबविताना एक पदावधी (३ वर्ष) आणि दोन पदावधी (६ वर्ष) पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांची यादी प्रसिद्ध केली जाते आणि त्यानंतर कर्मचाऱ्यांकडून विकल्प मागविले जातात. बीडच्या महसूल विभागाने दोन पदावधी पूर्ण झालेल्या वेगवेगळ्या संवर्गातील कर्मचाऱ्यांची यादी प्रसिद्ध केली, त्याबद्दलही कर्मचाऱ्यांच्या अनेक तक्रारी आहेतच , मात्र एक पदावधीची यादीच प्रसिद्ध केलेली नाही. त्यामुळे मग एक पदावधी पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना संभाव्य रिक्त जागा देखील समजत नाहीत. ज्यांचा त्या पदावरचा कालावधी कमी आहे अशा काही कर्मचाऱ्यांना जबरदस्तीने बदलीपात्र ठरविण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. तर तहसीलदार दर्जाच्या अधिकाऱ्यांनी तालुक्याबाहेर पाठवा म्हटलेल्या अनेक कर्मचाऱ्यांना मात्र बदलीपासून संरक्षण देण्याचा 'खेळ' सुरु आहे.
खाजगी फोनने कर्मचारी 'बहिरे' होण्याची वेळ
प्रशासनाने एका पदावधीची यादी जाहीर केलेली नाही, मात्र एक पदावधी पूर्ण होत असलेल्या कर्मचाऱ्यांना आस्थापनेतील एक कर्मचारी व्यक्तिगत पातळीवर फोन करून 'विकल्प' सांगा किंवा विनंती अर्ज द्या असे म्हणत आहे. हे फोन इतके येत आहेत की कर्मचाऱ्यांना 'बहिरे' होण्याची वेळ येते की काय असे वाटत आहे. यादी प्रसिद्ध न करता खाजगीत संपर्क साधण्याची ही 'चिनी' खेळी कोणत्या कारणासाठी सुरु आहे याचे उत्तर मात्र मिळत नाही.
या लपवाछपवीचा 'स्वामी' कोण?
नुकताच बीडच्या जिल्हाधिकारी पदाचा पदभार घेतलेल्या विवेक जॉन्सन यांची चंद्रपूरमधील कारकीर्द पारदर्शी राहिलेली आहे. मग आता बदली प्रक्रियेत यादीची, कालावधीची लपवाछपवी करण्याची कल्पना कोणाची आहे? या कल्पनेचा 'स्वामी' कोण आहे? आणि या लपवाछपवीमुळे अनेकांवर 'शिव शिव' करण्याची वेळ येत आहे त्याला जबाबदार कोण असा प्रश्न कर्मचारी खाजगीत विचारीत आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी वापरावा 'विवेक'
कर्मचाऱ्यांच्या बदल्यांमधून 'महसूल' मिळविणारी 'प्रोटोकॉलचे स्वामी' असणारी विकृती सध्या महसूल प्रशासनात सक्रिय आहे. महत्वाच्या पदावर बसून जमेल तिथे 'जमवायचे' अशी ही मानसिकता आहे. या मानसिकतेमुळे आपण आपल्याच कर्मचाऱ्यांना वेठीस धरीत आहोत याचेही भान काही लोकांना नाही. त्यामुळे आता नुतन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनीच बदली प्रक्रियेत आपला 'विवेक' वापरून 'प्रोटोकॉल चे स्वामी' विकृतीमधून कर्मचाऱ्यांची सुटका करावी अशी अपेक्षा कर्मचाऱ्यांना आहे.