Advertisement

संपादकीय अग्रलेख -शरद पवारांच्या राष्ट्रवादीची अपरिहार्यता

प्रजापत्र | Friday, 09/05/2025
बातमी शेअर करा

ज्यांना सोबत घेऊन शरद पवारांनी राष्ट्रवादी स्थापन केली त्या काँग्रेसमधील नेत्यांना सत्तेबाहेर राहण्याची फारशी सवय कधीच नव्हती आणि राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर देखील काही काळ सोडला तर राष्ट्रवादीच्या नेत्यांना सत्तेच्या बाहेर बसण्याची फारशी वेळ कधी आली नव्हती किंवा या नेत्यांचा तो स्वभाव देखील नाही. त्यामुळेच आता जेव्हा पुढचे साडेचार वर्ष तरी महाराष्ट्रात महायुतीचे सरकार टिकणार असल्याचे स्पष्ट आहे, इतका काळ विरोधात बसने  शरद पवारांच्या राष्ट्रवादीमधील अनेकांना पचणारे नाही. मुळात तत्व आणि विचारधारा हे राजकारणाचे महत्वाचे अंग असण्याचे दिवस कधीच गेले आहेत , त्यामुळे शरद पवार आणि अजित पवार हे राष्ट्रवादीचे दोन गट एकत्र आले तर त्यात आश्चर्यजनक असे काहीच नाही , किंबहुना ती शरद पवारांच्या राष्ट्रवादीची राजकीय अपरिहार्यता आहे.
 

महाराष्ट्रात अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीसोबत पुन्हा  सत्तेत आली आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला विधानसभा निवडणुकीत फारसे यश मिळविता आले नाही  तेव्हापासूनच या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याच्या चर्चा आहेत. दोन्ही गटातील नेते दबक्या आवाजात ते बोलून देखील दाखवितात. आता स्वतः शरद पवारांनीच 'आम्ही विचाराने एकच आहोंत' असे सांगून नव्या राजकीय चर्चांना सुरुवात करून दिली आहे. अर्थात पुन्हा हे सारे आपण करीत आहोत असे शरद पवारांना दाखवायचे नाही, त्यामुळे 'सुप्रिया सुळे किंवा नवी पिढी याबाबतचा निर्णय घेईल ' असे सांगून शरद पवार नामानिराळे झाले आहेत. सारे काही करून किंवा करवून पुन्हा त्यातून नामानिराळे राहण्याची कला आजघडीला  महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवारांइतकी कोणालाच साधलेली नाही, देवेंद्र फडणवीस देखील यात अजून तरी शरद पवारांपेक्षा कितीतरी मैल मागे आहेत. शरद पवारांचे वर्णन जिथे त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे 'द मोस्ट अनप्रिडीक्टेबल ' असे करतात तिथे इतरांना शरद पवार काय कळावेत ? बाकी राहिला प्रश्न विचारधारेचा , तर शरद पवारांनी ज्यावेळी पहिल्यांदा बंड केले होते आणि पुलोदचे सरकार स्थापन केले होते, त्यावेळी त्यांनी जनसंघाची सोबत केली होतीच , त्यामुळे शरद पवारांना राजकारणात कोणाचे वावडे आहे असल्या काही अंधश्रद्धा बाळगण्याचे काहीच कारण नाही. तसे काही असते तर भाजपला रोखण्याच्या नावाखाली का होईना त्यांनी शिवसेनेला सोबत घेतलेच नसते.
अर्थात आज शरद पवारांच्या राजकीय भूमिकांवर चर्चा करण्याचे देखील फारसे काही कारण नाही. कारण राज्यातीलच नव्हे तर देशातीलच राजकारण इतके गढूळ झाले आहे की यात कोणाकडून फार काही अपेक्षा ठेवण्यासारखी परिस्थिती नाही. आणि शरद पवारांच्या पक्षाबाबत तर हे नाहीच नाही. भाजपला तरी दीर्घकाळ विरोधात बसण्याची किमान सवय होती , मात्र काँग्रेस आणि काँग्रेसमधूनच बाहेर पडलेल्या राष्ट्रवादीला सत्तेशिवाय करमत नाही हे वास्तव आहे. शरद पवार भलेही धर्मनिरपेक्षता किंवा आणखी काही गोष्टी बोलून राजकीय गोळाबेरीज करीत आले असतील, पण सत्ता मिळत असेल तर फार काही साधनशुचिता वगैरे पाळण्याची आवश्यकता त्यांना वाटलेली नाही. तेच त्यांचे अनुयायी करीत आले आहेत. 'सत्ता सर्वार्थ साधनं' हेच कायम राष्ट्रवादीचे तत्व राहिलेले आहे.
त्यामुळे आता महाराष्ट्र विधानसभेच्या निकालानंतर राज्यात महायुतीची सत्ता कायम असल्याचे स्पष्ट झाल्यापासून नाही म्हटले तरी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अस्वस्थता आहेच. एकतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील अनेकजण आजही अजित पवारांशी जवळीक साधून आहेतच. आणि सत्तेच्या बाहेर कितीकाळ बसायचे? मागच्या सरकारमधील अडीच वर्ष विरोधातच गेली, आता आणखी पाच वर्ष विरोधात बसायचे तर मतदारसंघात काय सांगायचे ? याहीपेक्षा आपल्या संस्थानांचे , संस्थांचे काय हा प्रश्न अनेकांना पडलेला आहेच. जे काही थोडेबहुत नेते आज अजित पवारांसोबत आणि पर्यायाने भाजपसोबत जायला विरोध करीत आहेत, त्यातल्या अनेकांची अडचण देखील भाजपची विचारधारा असण्यापेक्षाही अजित पवारांचे नेतृत्व आणि त्यांच्या 'शिस्तीत ' काम कसे करायचे ही अधिक आहे, हे देखील कटू असले तरी वास्तव आहे. कारण या लोकांना कधी मोदींची पवारांनी केलेली स्तुती खटकली नव्हती , किंवा गुजरात दंगलीनंतरच्या काळात जेव्हा केंद्रात संपुआची सत्ता आली, त्यावेळी मोदींसाठी संरक्षक कवच म्हणून कोण होते हे या लोकांना माहित नाही असे नाही . त्यामुळे हा  संघर्ष विचारधारेचा आहे असे काही मानण्याची काहीच आवश्यकता नाही. आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीत जी काही अस्वस्थता आहे ती अस्वस्थता आहे स्वतःच्या अस्तित्वाची. या पक्षातील काही तरुणतुर्कांचे एकवेळ समजून घेता येईल, त्यांनी सत्तेची फळे फारशी चाखलेली नाहीत , पण ते वगळले तर बहुतेकांना सत्तेच्या सावलीतच वाढल्याने विरोधीपक्षातील वैशाख वणवा सहन होत नाही. त्यामुळे त्यांना कसेही करून सत्तेसोबत सोयरीक हवीच आहे . म्हणून देखील मागच्या काही महिन्यांपासून दोन्ही राष्ट्रवादीच्या एकीकरणाचा चर्चा सतत जिवंत राहील याचे प्रयत्न केले जातात. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे फारसे काही अडणार नाही , अजित पवारांना राज्याचे नेते म्हणून मान्यता आहे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील एक जयंत पाटील सोडले तर राज्यव्यापी नेतृत्व असे कोणते आहे? (शरद पवार सक्रिय राजकारणातून बाजूला होण्याचे संकेत अनेकवेळा देत आले आहेत आणि सुप्रिया सुळेंच्या राजकारणाला अनेक मर्यादा आहेत, बाकी रोहित पवारांच्या राजकारणाबद्दल आज काही भाष्य करणे योग्य होणार नाही ), त्यामुळे देखील दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार असतील तर बहुतेकांना ते हवेच आहे, आणि हीच शरद पवारांच्या राष्ट्रवादीची राजकीय अपरिहार्यता आहे, याची जाणीव राजकारणातील होकायंत्र असलेल्या शरद पवारांना नाही असे नाही, म्हणूनच त्यांनी आता दिशा दाखवायचे काम केले आहे असे समजायला हरकत नाही.

Advertisement

Advertisement