बीड दि. १४ (प्रतिनिधी ) : समाजातील असलेल्या , नसलेल्या समस्या दाखवायच्या , त्याचे कागदावर प्रकल्प तयार करायचे , त्यानुसार थातुर मातुर काम उरकायचे आणि त्यातून 'ग्राम' उपेक्षित राहिले तरी हरकत नाही पण स्वतःचा 'विकास ' मात्र साधायचा या एनजीओच्या देशमुखीचा अनुभव डोंगराळ भागातील ग्रामस्थांना देखील येत असून या कार्यक्रमाची देखील चौकशी होणे आवश्यक आहे.
बीड जिल्ह्यात एनजीओच्या नावाखाली स्वतःचा विकास करून घेणाऱ्या प्रवृत्ती मागच्या काही काळात वाढल्या आहेत. एनजीओच्या कक्षेत्रात अशा लोकांची 'देशमुखी ' इराणच्या अडचणी मात्र वाढविते. बीड जिल्ह्यातील काही गावांसाठी म्हणून एका एनजीओने 'डोंगराळ भागातील समुदायांना पिण्याचे स्वच्छ पाणी ' म्हणून एक प्रकल्प राबविला. आता या प्रकल्पासाठी निधी काही 'देशमुखी ' करणारे संस्थाचालक मजुरी करून आणणार नाहीत, त्यांना कोठून तरी फंडिंग झाली असणारच. तर त्या प्रकल्पांतर्गत काम झाले म्हणून अहवालाला फोटो जोडावे लागतात , त्यासाठी फलक देखील लावावा लागतो. आता एका गावात खोल विहीर, संरक्षण भिंत, १६०० मीटर पाईपलाईन, तीन ठिकाणी चबुतरे बांधून टाक्या, पशूंसाठी पिण्याच्या पाण्याचे हौद , वॉटर फिल्टर आणि जोडीला प्रशिक्षणे असे सारे काही या संस्थेने केल्याचे सांगितले जाते. त्यापैकी एका गावाला आम्ही भेट दिली, आता त्या गावात पाईप लाईन किती आहे आणि विहीर किती खोल याची मोजणी आणि चौकशी यातील तज्ज्ञांनी करावी , मात्र गावात तीन पाणी टाक्या मात्र पाहायला मिळत नाहीत, ज्या एका टाकीचा शोध लागला त्याचा चबुतरा देखील जुनाच असल्याचे गावकरी सांगतात . मग हा सारा कार्यक्रम खरोखर राबविला गेला का स्थानिक कोणाशी हातमिळवणी करून येथे देखील पाण्यावर लोणी काढले गेले याची चौकशी तर व्हायलाच पाहिजे.
कारण अगदी गाढवांना सांभाळण्याचे प्रकल्प देखील आपल्याच परिसरात राबविण्याचा आणि मग आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार मिळविण्यासाठी पैसे मोजण्याचा गाढवपणा करण्याचा देशमुखी इतिहास आहेच, त्याबद्दल पुढच्या भागात (क्रमशः )

प्रजापत्र | Sunday, 15/11/2026
बातमी शेअर करा
बातमी शेअर करा
