आसामच्या काझीरंगा येथे शुक्रवारी भीषण अपघात झाला. पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या ट्रॅव्हलरची ट्रकशी समोरासमोर धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की, ट्रॅव्हलरचा अक्षरशः चुराडा झालेला पाहायला मिळाला. या घटनेत २० हून अधिक लोक दगावल्याची भीती व्यक्त केली जात आहे. तर अनेक लोक ट्रॅव्हलरमध्ये अडकले होते. पोलीस आणि स्थानिकांनी मिळून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
आसामच्या गोलाघाट जिल्ह्यातील काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात हा अपघात घडल्याचे सांगितले जात आहे. बसमध्ये विद्यार्थ्यांची संख्या अधिक होती, अशी माहिती समोर आली आहे. गोलाघाटचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक स्वप्ननील डेका यांनी २३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे.डेका म्हणाले की, अपघातात २३ जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. बसमधून मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. बसमधून नेमके किती लोक प्रवास करत होते, याची मात्र अद्याप माहिती कळू शकलेली नाही.आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. काझीरंगा येथे झालेल्या अपघातामुळे मन व्यथित झाले. अपघातात बळी पडलेल्यांची संख्या ऐकून सर्वांनाच धक्का बसला. ज्यांनी आपले प्रियजन गमावले, त्यांच्या दुःखात मी आणि संपूर्ण राज्य सामील आहे. कोणत्याही शब्दांनी हे दुःख कमी होणार नसले तरी मी त्यांना सांगू इच्छितो की, तुम्ही एकटे नाही आहात. संपूर्ण आसाम राज्य तुमच्या पाठीशी आहे.

