धाराशिव : कौडगाव एमआयडीसी परिसरातील तांबेवाडी येथील महाजनकोच्या सौरऊर्जा प्रकल्पाला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत महाजनकोचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून, प्रकल्पातील १५ मेगावॉट वीजनिर्मिती ठप्प झाली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी धाराशिव आणि बार्शी येथील अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांना पाचारण करावे लागले. दरम्यान, आग विझवण्याचा प्रयत्न करताना नंदू कुलकर्णी या सुरक्षा रक्षकाच्या पायाला भाजले असून, त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कौडगाव परिसरात महाजनको आणि जर्मनीतील केएफडब्ल्यू (KfW) बँकेच्या आर्थिक सहकार्याने सुमारे ३०० एकर क्षेत्रावर हा सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पातून दररोज सुमारे ५० मेगावॉट वीजनिर्मिती केली जाते. एवढ्या मोठ्या क्षमतेच्या प्रकल्पाला आग लागल्याने परिसरात एकच गोंधळ उडाला.
आग लागल्यानंतर प्रकल्पातील सुरक्षा रक्षकांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, आगीने रौद्ररूप धारण केल्याने ती आटोक्यात आणणे शक्य झाले नाही. अखेर धाराशिव आणि बार्शी येथील अग्निशमन दलाच्या दोन गाड्यांच्या मदतीने आग नियंत्रणात आणण्यात आली. प्रकल्पाचा मोठा विस्तार आणि कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या यामुळे आगीने अल्पावधीतच मोठ्या क्षेत्रात पाय पसरल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेच्या निमित्ताने प्रकल्पातील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीत तांत्रिक ज्ञान असलेले कर्मचारी आणि प्रशिक्षित मनुष्यबळ घटनास्थळी उपस्थित असणे आवश्यक असताना, आग लागली त्यावेळी एकही तांत्रिक तज्ज्ञ कर्मचारी उपस्थित नसल्याची माहिती समोर येत आहे.तसेच आग विजवण्यासाठी लागणारे कुठलेही सामग्री याठिकाणी उपलब्ध नसल्याचे प्रतिक्षीदर्शिने सांगितले.
विशेष म्हणजे, या सुमारे ३०० एकर क्षेत्रावरील प्रकल्पाची स्वच्छता आणि गवत काढण्याची जबाबदारी सिन्टेक कंपनीकडे असल्याचे सांगितले जाते. मात्र, आग लागली त्यावेळी या कंपनीचे कर्मचारीही घटनास्थळी उपस्थित नव्हते. प्रकल्प परिसरात मोठ्या प्रमाणात वाढलेले गवत आगीच्या प्रसारास कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे. सिन्टेक कंपनीने वेळेवर गवत कापून परिसराची स्वच्छता केली असती, तर आगीचा प्रसार रोखता आला असता आणि संभाव्य नुकसानही टाळता आले असते, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.
या आगीमुळे प्रकल्पातील १५ मेगावॉट क्षमतेची वीजनिर्मिती बंद पडली असून, जवळपास एका दिवसात चार लाख युनिट विजेचे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे महाजनकोला मोठा आर्थिक फटका बसणार आहे.
दरम्यान, सिन्टेक कंपनीच्या कामकाजाबाबत यापूर्वीही भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) कडे तक्रारी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे या घटनेच्या पार्श्वभूमीवर संबंधित कंपनीच्या कामकाजाची, प्रकल्पातील स्वच्छतेची आणि सुरक्षा व्यवस्थेची सखोल चौकशी करण्याची गरज व्यक्त होत आहे. या आगीचे नेमके कारण आणि नुकसानीचा अधिकृत आकडा चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे.

