बीड: राज्य विधानपरिषदेच्या औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली आहे. या मतदारसंघात आतापर्यंत भाजप विरुद्ध काँग्रेस किंवा राष्ट्रवादी असाच सामना झालेला आहे. मात्र यावेळी राष्ट्रवादी भाजप सोबत युतीमध्ये आहे, त्यामुळे येथे भाजपची गोची होणार आहे, तर दुसरीकडे तीन वेळा या मतदारसंघाचे नेतृत्व केलेल्या आं. सतीश चव्हाण यांच्या विरोधात विरोधी पक्षांकडे तुल्यबळ चेहरा आज तरी दिसत नसल्याने चव्हाणांचा मार्ग सुकर असल्याचे चित्र आहे.
औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली असून यासाठी २२ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. या मतदारसंघात आतापर्यंत भाजप विरुद्ध काँग्रेस किंवा राष्ट्रवादी अशीच लढत झालेली आहे. २००८ पासून या मतदारसंघाचे तीन वेळा प्रतिनिधित्व केलेल्या सतीश चव्हाण यांनी तिन्ही निवडणुकांमध्ये भाजपचा पराभव केलेला आहे. मात्र आता त्याच सतीश चव्हाणांची राष्ट्रवादी युतीमध्ये भाजपसोबत आहे. युतीच्या समीकरणांमुळे ही जागा राष्ट्रकडीकडे जाणे जवळपास निश्चित मानले जाते, कदाचित त्यामुळेच येथून भाजकडून इच्छुक असलेल्या प्रवीण घुगेंनी मागच्या काळात या मतदारसंघाकडे दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळाले. भाजपने येथून किरण पाटील यांना उमेदवारी द्यावी अशी मागणी होत असली तरी युतीच्या समीकरणांमध्ये या मागणीचा निभाव किती लागेल हे सांगणे अवघड आहे.
या मतदारसंघाची सारी गणिते नोंदणीवर अवलंबून असतात, त्यात आज तरी सतीश चव्हाण सर्वात पुढे आहेत. १८ वर्षांपासून मतदारसंघावर ताबा आणि सोबतीला संस्थांचे जाळे, स्वतःची समांतर यंत्रणा या त्यांच्या जमेच्या बाजू असून विरोधी चेहरा अजून समोर यायचा आहे.
मतदारसंघाचा इतिहास
पूर्वीच्या पुणे-औरंगाबाद या संयुक्त पदवीधर मतदारसंघातून ८४ साली औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निर्माण झाला. संयुक्त मतदारसंघाच्या शेवटच्या आमदार होत्या अहिल्या रांगणेकर. ८४ साली वसंतराव काळे येथून निवडून आले. ९० मध्ये त्यांचा पराभव करत भाजपचे जयसिंगराव गायकवाड यांनी हा मतदारसंघ पहिल्यांदा भाजपला दिला. ९६ ला ते पुन्हा येथून निवडून आले, मात्र ९८ ला त्यांनी राजीनामा देवून लोकसभा निवडणूक लढविली. त्यावेळच्या पोटनिवडणुकीत भाजपच्या श्रीकांत जोशींना पराभूत करत वसंतराव काळे पुन्हा आमदार झाले. २००२ मध्ये मात्र श्रीकांत जोशी यांच्या माध्यमातून हा मतदारसंघ पुन्हा भाजपने जिंकला. मात्र त्यानंतर येथे भाजपला कधी संधी मिळाली नाही. २००८,२०१४ आणि २०२० या सलग तीन निवडणुका राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांनी जिंकल्या.

