मुंबई : राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे. पावसाने अपेक्षित साथ न दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी पूर्णपणे उध्वस्त झाले असताना, सरकार तातडीने उपाययोजना करण्याऐवजी 'आता करू, नंतर करू' म्हणत वेळकाढू धोरण अवलंबत आहे. चिमूरमध्ये सरकारविरोधात हल्लाबोल करण्यात आला असून, गणपती विसर्जनानंतर मराठवाडा, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात तीव्र मोर्चे काढण्यात येणार आहेत, अशी महत्त्वाची घोषणा काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केली.
शेतीचा मोठा अनुभव असलेल्या शरद पवारांनी केलेल्या मागण्यांना सरकारने गांभीर्याने घेतल्या पाहिजेत. आज शेतकरी मोठ्या संकटात आहे. अशा परिस्थितीत सरकारकडून तातडीच्या मदतीची आणि ठोस घोषणेची अपेक्षा होती. सरकार मात्र वेळकाढूपणा करत आहे. त्यामुळे आज चिमूरमध्ये सरकारविरोधात हल्लाबोल आंदोलन करत आहोत. विरोधक म्हणून आमची जबाबदारी शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याची आहे. गणपती विसर्जनानंतर मराठवाडा, पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातील विविध भागांत दुष्काळाच्या प्रश्नावर आंदोलनाची दिशा ठरवली जाईल. जिल्ह्या-जिल्ह्यातून कार्यकर्त्यांचे फोन येत आहेत. परिस्थिती गंभीर आहे. सरकार विरोधात शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आम्ही ताकदीने लढू," असा स्पष्ट इशाराही वडेट्टीवार यांनी दिला.

